
अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar
दुचाकीवरून नगर शहरात सुगंधी तंबाखू विक्री करण्यासाठी घेऊन निघालेल्या युवकाला कोतवाली पोलिसांनी पकडले. शौकत चाँद शेख (वय 24 रा. गाझीनगर, काटवन खंडोबा) असे त्याचे नाव आहे. त्याच्याकडून 60 हजाराची सुगंधी तंबाखू व दुचाकी असा 80 हजार रूपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
रविवारी (दि. 18) सायंकाळी पावणे पाच वाजता पोलिसांनी ही कारवाई केली. पोलीस अंमलदार अभय कदम यांनी दिलेल्या फिर्यादीवरून शौकत चाँद शेख विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. काटवन खंडोबा कमानीच्या रोडने एक इसम दुचाकीवरून सुगंधी तंबाखू विक्री करण्याकरिता घेऊन जाणार आहे, अशी माहिती कोतवाली पोलिसांना मिळाली होती.
पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांनी पोलीस अंमलदार गणेश धोत्रे, योगेश भिंगारदिवे, ए. पी. इनामदार, सलीम शेख, कदम, सुजय हिवाळे, अतुल काजळे यांना कारवाई करण्याचे आदेश दिले. पोलिसांनी पावणे पाच वाजता आयुर्वेदिक कॉलेजच्या दिशेकडून काटवन खंडोबा कमानीकडे जाणार्या संशयित दुचाकीस्वाराला पकडले. त्याने त्याचे नाव शौकत चाँद शेख असे सांगितले. त्याची पंचासमक्ष झडती घेतली असता त्याच्याकडे 12 बॅगमध्ये 60 हजार रुपये किमतीची सुगंधी तंबाखू मिळून आली. पोलिसांनी दुचाकीसह सुगंधी तंबाखू जप्त केली असून शेख विरोधात गुन्हा दाखल केला आहे.