सव्वा दोन लाखांची सुगंधी तंबाखू पकडली

एलसीबीची वडगाव गुप्ता येथे कारवाई || तिघांविरूध्द गुन्हा
सव्वा दोन लाखांची सुगंधी तंबाखू पकडली

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

टेम्पोमधून वाहतूक केली जात असलेली दोन लाख 25 हजार रूपयांची सुगंधी तंबाखू स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी पकडली. चार लाखाचा टेम्पो व दोन लाख 25 हजाराची तंबाखू असा सहा लाख 25 हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. वडगाव गुप्ता ते पिंपळगाव माळवी रोडवर बायपास चौकात गुरूवारी रात्री पोलिसांनी ही कारवाई केली.

या प्रकरणी पोलीस अंमलदार कमलेश पाथरूट यांच्या फिर्यादीवरून तिघांविरूध्द एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सौरभ मुकुंद धामनगावकर (वय 30), सलमान अहमद शेख (वय 30) व झाहीद ऊर्फ जावेद कदीर खान (वय 31, तिघे रा. गोविंदपुरा, मुकुंदनगर) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. काही इसम सुगंधी तंबाखूची वडगाव गुप्ता ते पिंपळगाव माळवी रोडने वाहतूक करत असल्याची माहिती पोलीस निरीक्षक अनिल कटके यांना मिळाली होती.

त्यांनी त्यांच्या पथकाला माहिती घेऊन कारवाई करण्याच्या सूचना दिल्या. पथकाने दोन पंचासमक्ष गुरूवारी रात्री बायपास चौकात सापळा लावला. संशयीत टेम्पो (एमएच 14 जीयू 3968) पथकाने पकडला. त्याची झडती घेतली असता त्यामध्ये 15 गोण्यात सुगंधी तंबाखू मिळून आली. पोलिसांनी सुगंधी तंबाखूसह टेम्पो ताब्यात घेतला. सदरची तंबाखू झाहीद खान यांची असल्याची माहिती समोर आली आहे. अधिक तपास एमआयडीसी पोलीस करीत आहेत.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com