‘त्या’ सुगंधी तंबाखूची फिर्याद देण्यास टाळाटाळ?

पोलिसांनी पत्र देऊन देखील अन्न प्रशासन विभाग थंड
‘त्या’ सुगंधी तंबाखूची फिर्याद देण्यास टाळाटाळ?

अहमदनगर (प्रतिनिधी) / AHMEDNAGAR - अप्पर पोलीस अधीक्षक सौरभकुमार अग्रवाल यांच्या विशेष पथकाने 24 जून रोजी सावेडीत पकडलेल्या सुगंधी तंबाखू प्रकरणी aromatic tobacco अद्याप तोफखाना पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल झाली नाही. कारवाई केल्यानंतर लगेच तोफखाना पोलिसांनी अन्न प्रशासन विभागाला पत्र दिले आहे. मात्र, सहा दिवस झाले तरी अन्न प्रशासनाचे अधिकारी फिर्याद देण्यासाठी तोफखाना पोलीस ठाण्यात आले नाही. पोलिसांनी पत्र देऊन देखील अन्न प्रशासनाकडून फिर्याद देण्यासाठी टाळाटाळ केली जात असल्याचे चित्र आहे. Food And Drug Administration

अप्पर अधीक्षक अग्रवाल यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्ह्यातील अवैध धंद्यांवर छापेमारी करण्यासाठी चार पथकांची नियुक्ती केली आहे. तोफखाना पोलीस ठाणे हद्दीतील सावेडीच्या संदेशनगरमध्ये सुगंधी तंबाखूपासून मावा निर्मिती केली जात असल्याची माहिती अप्पर अधीक्षक अग्रवाल यांना मिळाली होती. त्यांनी विशेष पथकाचे निरीक्षक अरविंद माने यांच्या नेतृत्वाखाली पथक पाठवून सदर ठिकाणी छापा टाकला. यावेळी सुगंधी तंबाखू व तयार मावा पोलिसांना मिळून आला.

67 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करून तोफखाना पोलीस ठाण्यात जमा करण्यात आला आहे. तसे पत्र अन्न प्रशासन विभागाला देण्यात आले आहे. सहा दिवस झाल्यानंतरही अन्न प्रशासन विभागाने फिर्याद दिलेली नाही. गुटखा विक्रेत्यांना वाचविण्याचा प्रयत्न अन्न प्रशासनाकडून होत असल्याची चर्चा आहे. पोलिसांनी कारवाई करून देखील अन्न प्रशासनाकडून फिर्याद दिली जात नाही. कारवाई दरम्यान जप्त गुटखा ताब्यात घेऊन त्याचे नमुने प्रयोगशाळेत पाठविणे अन्न प्रशासनाचे काम आहे. परंतु, अन्न प्रशासन जाणिवपूर्वक टाळाटाळ करत असल्याचे दिसून येत आहे. दरम्यान, पोलिसांकडून अन्न प्रशासनाला स्मरणपत्र दिले जाणार असल्याचे सुत्रांनी सांगितले.

कारवाई केल्याबाबतचे पत्र तोफखाना पोलिसांकडून मिळाले आहे. शहर अन्न सुरक्षा अधिकारी शरद पवार यांना सूचना दिल्या आहेत. पोलिसांनी कारवाई केली, तर फिर्याद त्यांनीच द्यावी.

- संजय शिंदे (सहायक आयुक्त, अन्न प्रशासन विभाग, नगर)

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com