नायक कदम यांच्यावर शासकीय इतमात अंत्यसंस्कार

नायक कदम यांच्यावर शासकीय इतमात अंत्यसंस्कार

पारनेर|तालुका प्रतिनिधी| Parner

आसाम येथील तेजपूर येथे कर्तव्य बजावत असताना प्रशिक्षणाच्या दरम्यान निधन झालेल्या तालुक्यातील पिंपरी जलसेन येथील नायक भरत लक्ष्मण कदम यांच्यावर रविवारी सकाळी 11 वाजता मूळगावी शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी मोठा जनसमुदाय उपस्थित होता.

शुक्रवारी आसाम येथील तेजपूर येथे सकाळी मॉर्निंग बिपिटी प्रशिक्षण सुरू असताना अचानक छातीत दुखू लागल्याने नायक भरत कदम यांना हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. त्यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. त्यानंतर त्यांचे पार्थिव शासकीय विमानाने आसामवरून दिल्ली व दिल्ली वरून पुण्यात आणण्यात आले.

त्यानंतर पुण्यावरून रुग्णवाहिकामधून त्यांचे पार्थिव त्यांच्या राहत्या गावी पिंपरी जलसेन येथे आणण्यात आले. शासकीय इतमामात पिंपरी जलसेन येथे पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

यावेळी तहसीलदार ज्योती देवरे, पारनेरचे पोलीस निरीक्षक राजेश गवळी यांनी यावेळी प्रशासकीय चोख बंदोबस्त ठेवला. यावेळी पारनेरचे आमदार निलेश लंके, जिल्हा परिषद माजी सदस्य अ‍ॅड. आझाद ठुबे, पंचायत समिती सदस्य डॉ. श्रीकांत पठारे, गांजीभोयरेचे सरपंच डॉ.आबासाहेब खोडदे, लहू थोरात आदी उपस्थित होते.

भारत भूमिचा तारा निखळला - तहसीलदार देवरे

देशसेवा करत असताना वीरमरण प्राप्त झालेल्या नायक भरत कदम यांनी अखेरच्या श्वासापर्यंत देशसेवा केली आहे. त्यांच्या एकुलत्या एक मुलीच्या पहिल्या वाढदिवसाला येण्याची त्यांची इच्छा अधुरी राहिली असून नायक भरत कदम यांच्या माध्यमातून भारत भूमिचा एक भरत तारा निखळला असल्याची प्रतिक्रिया तहसीलदार ज्योती देवरे यांनी श्रद्धांजली अर्पण करताना व्यक्त केली.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com