पोलिस अधीक्षकांसह तिघांना नोटीस

लष्कराच्या बनावट एनओसी प्रकरण
पोलिस अधीक्षकांसह तिघांना नोटीस

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

नगरातील लष्करी हद्दीजवळील नागरी क्षेत्रात बांधकाम करण्यासाठी लष्करी अधिकार्‍यांच्या बनावट ना हरकत प्रमाणपत्र (एनओसी) प्रकरणात योग्य तपास झाला नसल्याचा दावा तक्रारदार शाकीर शेख यांनी औरंगाबाद खंडपीठात दाखल दाखल करून केला होता. या याचिकेची प्राथमिक सुनावणी झाली आहे.

जिल्हा पोलिस अधीक्षक राकेश ओला, तपास अधिकारी तथा शहर विभागाचे उपविभागीय पोलिस अधिकारी अनिल कातकडे व कोतवाली पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षकांना यांना म्हणणे सादर करण्यासाठी औरंगाबाद खंडपीठाचे न्यायमूर्ती मंगेश पाटील व न्यायामूर्ती एम. एम. साठ्ये यांनी नोटिसा काढण्यात आल्या आहेत.

लष्कराच्या हद्दीजवळच्या मालमत्ता व प्लॉटवर बांधकाम परवानगीसाठी आर्मी हेडक्वार्टरकडून ना-हरकत दाखला घ्यावा लागतो. नगर उपविभागीय कार्यालयात दाखल करण्यात आलेल्या दाखल्यांपैकी काही दाखले बनावट असल्याचे समोर आले आहे. महसूल सहाय्यक संजय गोलेकर यांनी दिलेल्या फिर्यादीवरून 28 सप्टेंबर 2022 रोजी कोतवाली पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपासी अधिकारी तथा पोलिस उपअधीक्षक कातकडे यांनी गुन्ह्याचा तपास करून न्यायालयात आरोपपत्र दाखल केले.

बनावट एनओसीचे केवळ तीन गुन्हे दाखल आहेत. पोलिसांनी या तपासाची व्याप्ती वाढवून याप्रकरणाशी संबंधित आणखी कोण-कोण आहेत, यांचा शोध घेणे गरजेचे होते. तसेच अन्य काही अशी फसवणुकीची प्रकरणे घडली आहेत काय, याचाही शोध घेऊन त्यासंदर्भातही गुन्हे दाखल करणे आवश्यक होते. संबंधित प्रकरण राष्ट्रीय सुरक्षेशी संबंधित असल्याने या बनावट एनओसी प्रकरणाचा तपास राष्ट्रीय तपास यंत्रणा (एनआयए) यांच्याकडे देण्याची मागणी केली आहे. पोलिस अधीक्षकांसह तिघांना म्हणणे सादर करण्यासाटी नोटीस काढण्यात आल्या आहेत. या याचिकेची पुढील सुनावणी 12 एप्रिल रोजी होणार आहे. शेख यांच्यावतीने अ‍ॅड. प्रज्ञा तळेकर व अ‍ॅड. अजिंक्य काळे यांनी तर सरकार पक्षातर्फे अ‍ॅड. एस. जे. सलगरे यांनी युक्तिवाद केला.

विशेष पोलीस महानिरीक्षकांकडून स्वतंत्र चौकशी सुरू

भिंगार कॅम्प पोलिस ठाण्यात बनावट एनओसी प्रकरणाची तक्रार आल्यावर लष्करी आस्थापना व महसूल विभागाने यासंदर्भात गुन्हा दाखल करण्याची मागणी भिंगार कॅम्प पोलिस ठाण्याकडे केली होती. पोलीस ठाण्याचे प्रभारी सहायक पोलिस निरीक्षक एस. ए. देशमुख यांनी चौकशी सुरू असल्याचे कारण सांगून पाच महिने त्यावर काहीच कार्यवाही केली नाही. शेख यांनी नाशिक विभागाचे विशेष पोलिस महानिरीक्षक डॉ. बी. जी. शेखर पाटील यांच्याकडे तक्रार केली होती. त्यांनी ही याबाबत सविस्तर अहवाल मागविला आहे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com