पाथर्डी : सशस्त्र दरोडा अडीच लाखाचा ऐवज लंपास
सार्वमत

पाथर्डी : सशस्त्र दरोडा अडीच लाखाचा ऐवज लंपास

Nilesh Jadhav

खरवंडी कासार | वार्ताहार | Kharavandi Kasar

पाथर्डी तालुक्यातील खरवंडी शिवारात केळगंद्रे वस्तीवर पाच चोरट्यांनी शनिवारी रात्री एक वाजल्यानंतर घराचा दरवाजा बाहेरुन कटावणी उचकटून व महिलेला धारदार शस्त्राचा धाक दाखवून 2 लाख 64 हजार रुपयाचा ऐवज चोरला. दरोडेखोरांनी ‘सोना और पैसे दे दो वरना बच्चे को मार डालुगा’, असे म्हणत सोन्याचे दागीने व रोख रक्कम लंपास केली आहे. भगवानगड परीसरात वाढत्या चोरीच्या घटनेमुळे खरवंडी कासार परिसरात भितीचे वातावरण निर्माण झाले आहे.

घटनेची माहिती समजताच अहमदनगर पोलीस अधिक्षक अखिलेशकुमार सिंग, अपर पोलीस अधीक्षक सागर पाटील, पोलीस उपअधीक्षक मंदार जवळे, पाथर्डी पोलीस निरीक्षक रमेश रत्नपारखी, सहा. पोलीस निरीक्षक दिलीप राठोड, पो. काँ. संदीप गर्ज यांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला. श्वानपथकाने खरवंडी कासार स्वामी समर्थ मंदीर ते मीडसांगवी असा मार्ग काढला.

पाच चोरटे कटरच्या सहायाने दरवाजा तोडून घरात घुसले. चोरट्यांनी घराच्या दरवाजावर दगड मारले असता आरडा ओरडा झाला. घरातील लोक जागे झाल्याने पांडुरंग केळगंद्रे यांच्या घराला कडी लावून सून वंदना केळगंद्रे यांच्या रुमचा कटरने दरवाजा तोडून घरात घुसले वंदना केळगेंद्रे यांनी चोरट्यांना पहातच प्रतिकार करण्याचा प्रयत्न केला.

परंतु लहान मुलांना जिवे मारण्याची धमकी दिल्याने त्यांनी भीतीपोटी अंगावरील दागीने बळजबरीने घेतले. घरातील कपाटाचे दार तोडून रोख रक्कम चोरुन गेली. शिवाय घरासमोरील मोटरसायकलवर दगड मारुन नुकसान केले आहे. पांडुरंग केळगंद्रे यांनी पाथर्डी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक दिलीप राठोड करत आहेत.

दरम्यान खरवंडी कासार परीसरात वाढत्या चोरीच्या घटनेमुळे दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे. खरवंडी कासारमधून तीन राष्ट्रीय महामार्ग जात असल्याने महामार्गावर रात्री जबरी चोरी, दरोडे आदी घटना घटत आहेत.

भगवानगडावर संत भगवानबाबा यांच्या ऐतिहासिक पुरातून वास्तुंपैकी रायफल तलवार चोरीस गेल्याची धक्कादायक घटना घडली होती. अद्याप चोरीचा तपास लागला नाही. त्यातच खरवंडी कासार परीसरात चोरट्यांनी दरोडा टाकत दहशत निर्माण केली आहे. खरवंडी कासार येथील पोलीस दुरक्षेत्र कायमस्वरूपी सुरु ठेवावे, अशी मागणी केली आहे.

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com