संगमनेर (शहर प्रतिनिधी) -

एखाद्या व्यक्तीवर दोनपेक्षा अधिक गुन्हे दाखल असतील तर त्याची संपूर्ण माहिती संकलीत करण्याचा उपक्रम जिल्हा पोलीस

प्रमुख मनोज पाटील यांनी सुरु केला आहे. मात्र अद्यावत यादी तयार करण्याच्या नावाखाली संगमनेर शहर पोलीस मनमानी करत असल्याचा आरोप एकलव्य आदिवासी बहुउद्देशीय सामाजिक संघटनेचे प्रदेशाध्यक्ष योगेश मनोहर सुर्यवंशी यांनी केला आहे.

प्रसिध्दीस दिलेल्या पत्रकात सुर्यवंशी यांनी म्हटले आहे की, शहर पोलीस ठाण्यात डी. वाय. एस. पी. यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस ठाण्यात बैठक असून ते मार्गदर्शन करणार असल्याचे शहर पोलीस कर्मचार्यांनी खोटे सांगून मला पोलीस ठाण्यात येण्यास साांगितले. या ठिकाणी माझी कसुन चौकशी केली. देशद्रोह्यासारखी वागणूक दिली. माझ्याबरोबर असणार्या इतर व्यक्तींना सराईत गुन्हेगारांची टोळी भासावी अशा पध्दतीने उभे करुन मोबाईलमध्ये शुटींग करुन घेतली. कायदा सुव्यवस्था अबाधीत ठेवण्यासाठी आमची माहिती संकलीत करुन इतर गुन्ह्यांच्या वेळी इतर ठिकाणी वापरुन आमचा बळीचा बकरा होण्याची शक्यता नाकारता येत नाही. राजकीय दबावातून आमच्यावर गुन्हे दाखल झालेले आहे. सामाजिक काम करत असताना आम्हाला वाद मिटविण्यासाठी तेथे जावेच लागणार आहे. चुकीच्या व अन्यायकारक गोष्टींविरुध्द आम्हाला वाचा फोडावीच लागणार आहे. अशा वेळी आपण आमची संकलीत केलेल्या माहितीचा आधार घेवून आमच्या विरुध्द खोटे गुन्हे दाखल करण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे शहर पोलीस ठाण्याच्या अधिकार्यांनी आपली मनमानी थांबवावी अन्यथा या विरोधात अॅड. विशाल जाधव यांच्या मार्फत औरंगाबाद खंडीपीठात सदर प्रकरणाबाबत प्रशासनाविरुध्द दाद मागावी लागेल, असाही इशारा सुर्यवंशी यांनी दिला आहे.

संगमनेरात 150 जणांचा समावेश

जिल्हा पोलीस प्रमुख मनोज पाटील यांच्या सूचनेनुसार दोन पेक्षा अधिक गुन्हे दाखल असणार्या गुन्हेगारांची यादी अद्यावत करण्यात येत आहे. संगमनेर शहर पोलीस ठाण्यांतर्गत 150 जणांची यादी तयार करण्यात आली असून ती जिल्हा पोलीस प्रमुखांना पाठविण्यात आली होती. संगमनेरात अनेक गुन्हेगारांवर दोनपेक्षा अधिक गुन्हे दाखल असतांना त्यांचे नाव या यादीत समाविष्ट करण्यात आले नसल्याचे दिसते.