अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

नगर अर्बन बँकेच्या पिंपरी चिंचवड शाखेत 22 कोटी रुपयांच्या गैरव्यवहारप्रकरणी पोलिसांनी आतापर्यंत चार जणांना अटक केली आहे.

या गुन्ह्यात डॉ. नीलेश शेळके याचे नाव समोर आले आहे. डॉ. शेळके याच्या खात्यामध्ये गैरव्यवहाराची रक्कम जमा झाल्याची माहिती पोलीस तपासात समोर आल्याने आर्थिक गुन्हे शाखेचे पोलिस त्यांना आज नगर अर्बनच्या गुन्ह्यात वर्ग करुन घेणार असल्याची माहिती पोलीस निरीक्षक वसंत बाबर यांनी दिली.

नगर अर्बन बँकेचे अधिकारी महादेव साळवे यांच्या फिर्यादीवरून चिंचवड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता. नगर अर्बन बँकेच्या पिंपरी-चिंचवड शाखेत प्रत्येकी 11 कोटी रुपयांची दोन बोगस कर्ज प्रकरणे करण्यात आलेली आहेत. त्यात मिळकतीचे बनावट मूल्यांकन सादर करून बँकेची फसवणूक फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला आहे.

याप्रकरणी आर्थिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी तत्कालीन संचालक नवनीत सुरपुरिया, कर्जदार यज्ञेश चव्हाण, आशुतोष लांडगे, जयदीप वानखेडे यांना अटक केली असून सध्या ते पोलीस कोठडीत आहेत. दरम्यान, शहर बँकेच्या गुन्ह्यात अटकेत असलेला डॉ. नीलेश शेळके याचे नगर अर्बन बँकेच्या गुन्ह्यात नाव आले आहे.

22 कोटींपैकी काही रक्कम डॉ. शेळके यांच्या खात्यावर गेली असल्याचे तपास निष्पन्न झाले आहे. तर, काही लोकांच्या खात्यावरही रक्कम गेल्याचे तपासात समोर आले आहे. पिंपरी चिंचवड येथील आर्थिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी डॉ. शेळके यांना अर्बन बँकेच्या गुन्ह्यात वर्ग करण्याची प्रक्रिया आज केली जाणार आहे, अशी माहिती निरीक्षक बाबर यांनी दिली.