आरडगावातील भुरट्या चोरांचा बंदोबस्त करा
सार्वमत

आरडगावातील भुरट्या चोरांचा बंदोबस्त करा

ग्रामस्थांच्या बैठकीत मागणी; चोरट्यांच्या नातेवाईकांना दिली ‘कानपिळी’

Arvind Arkhade

आरडगाव|वार्ताहर|Aradgav

राहुरी तालुक्यातील आरडगाव येथे रात्रीच्या वेळी गावातीलच भुरट्या चोरांचा सुळसुळाट वाढल्याने या चोरट्यांचा व दारू, मटका, जुगार यासारखे अवैध धंदे बंद करावे, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.

यावर ग्रामस्थांनी तातडीने बैठक घेऊन राहुरी पोलिसांना लेखी निवेदन देण्याचा ठराव संमत करून कारवाईची मागणी केली आहे.

गेल्या अनेक दिवसांपासून गावात छोट्या मोठ्या चोर्‍यांचे प्रमाण वाढत चालले आहे. संजय मारूती म्हसे यांच्या घरासमोरून रात्री गावातील काही भुरट्या चोरट्यांनी साथीदाराच्या सहकार्याने दुचाकी चोरून नेली. तिचा तपास काढत नाऊर ता.श्रीरामपूर येथे जाऊन या चोरट्यांना राहुरी पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले.

या कारणावरून ग्रामस्थांची तातडीने बैठक बोलावून या चोरट्यांच्या नातेवाईकांना बोलाविण्यात आले. गावातील विद्युत मोटारी, केबल, कोंबड्या, शेळ्या, बोकड, ग्रामपंचायतमार्फत गावात ठिकठिकाणी लावलेले सौर ऊर्जेवरील इन्व्हर्टर, बॅटर्‍या, दुकानदारांच्या वस्तू यासारख्या चोर्‍यांना तुमची मुले जबाबदार असल्याचे सुनावण्यात आले.

हे लवकरात लवकर थंबले पाहिजे, नाही तर यापुढे चोरी झाल्यास याला जबाबदार धरून पोलिसांकडे न जाता चांगला चोप दिला जाईल, असे सांगितले. तसेच गावातील दारू, मटका, जुगार यासारखे अवैध धंदे बंद करण्याचा निर्णय ग्रामस्थांनी घेतला. याबाबत लेखी निवेदन तयार करून राहुरी पोलिसांना देण्याचा निर्णय या बैठकीत घेण्यात आला आहे.

यावेळी डॉ. तनपुरे कारखान्याचे संचालक रवींद्र म्हसे, सरपंच कर्णा जाधव, सुनील मोरे, पोपट झुगे, भाऊसाहेब देशमुख, प्रमोद झुगे, बाळासाहेब म्हसे, बापूसाहेब धसाळ, गोविंद म्हसे, अशोक काळे, मनोहर म्हसे, लक्ष्मण शेळके, बाबासाहेब जाधव, मच्छिंद्र भुसारे, रमेश बुरूडे, बाळासाहेब वाकडे, जगन्नाथ राऊत, सचिन धसाळ, केशव म्हसे, दिगंबर जगधने, अण्णासाहेब जाधव, गणेश चोथे, संजय गागरे, चंद्रकांत म्हसे, चंद्रकांत कणसे, संजय जगधने, नितीन काळे, सादिक पठाण, पोपट पवार, अंबादास भारती, अनिल शेळके, आयुब पठाण, ताराचंद गायकवाड, नानासाहेब देशमुख, जालिंदर जाधव, शादिक पठाण, पोलीस पाटील लक्षण जाधव यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते.

Deshdoot Digital Dhamaka | देशदूत डिजिटल धमाका
www.deshdoot.com