आरडगावच्या सौरउर्जा प्रकल्पाचे काम वंचित आघाडीने बंद पाडले

प्रकल्पाचा ठराव ग्रामसभेद्वारा जिल्हाधिकार्‍यांना पाठविला-सरपंच जाधव
आरडगावच्या सौरउर्जा प्रकल्पाचे काम वंचित आघाडीने बंद पाडले

आरडगाव |वार्ताहर| Aradgav

राहुरी तालुक्यातील आरडगाव येथे सुरू असलेल्या सौरउर्जा प्रकल्पाचे सुरू असलेले काम वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्यांनी बंद पाडले. ग्रामसभेत ठराव संमत करून ग्रामस्थांना विश्वासात घेऊन हे काम करण्याची मागणी करण्यात आली.

दरम्यान, या प्रकल्पाचा ठराव ग्रामसभेद्वारा जिल्हाधिकार्‍यांना देण्यात आला असल्याची माहिती सरपंच कर्णा जाधव यांनी दिली आहे. या ठरावाची प्रक्रिया अर्धवट राहिलेली असून अद्याप त्यावर करारनामा व्हायचा आहे. मात्र, ग्रामपंचायत संबंधितांना ही गायरान जमीन देताना अटी आणि शर्तीच्या अधीन राहूनच या प्रकल्पाला ग्रामसभेच्याच परवानगीने जमीन देणार आहे. यात ग्रामपंचायतीचा पर्यायाने गावाचा आर्थिक फायदा होणार असले तरच ही प्रक्रिया पूर्ण करू. अन्यथा हा प्रकल्प रद्द करण्याची परवानगी ग्रामसभेत घेणार आहोत. यात गावाचा काही फायदा होणार नसेल तर यातील एक गुंठाभरही जमीन या प्रकल्पाला देणार नसल्याचा पुनरूच्चार सरपंच जाधव यांनी केला आहे. या प्रकल्पातून ग्रामपंचायतीला वार्षिक उत्पन्न मिळणार असल्याचे जाधव यांनी सांगितले.

आरडगाव येथे राहुरी-मांजरी रोडलगत 25 एकर जागेत सौरउर्जा प्रकल्पाचे काम सुरू झाले आहे. शेतकर्‍यांना दिवसा वीज मिळावी म्हणून उर्जा राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांच्या पाठपुराव्याने हे काम सुरू करण्यात आले आहे. काल शनिवारी दुपारी वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्यांनी सुरू असलेले काम थांबविले. अनिल जाधव म्हणाले, या प्रकल्पाला गावाची 25 एकर गायरान जमीन देण्यात आली आहे. याचा गावाला काय फायदा? यात सत्ताधार्‍यांनी ग्रामस्थांना विश्वासात घेतलेले नाही. त्यामुळे मी उपोषणाला बसलो होतो. त्यावेळी हा निर्णय ग्रामसभेत होईल, असे आश्वासन देण्यात आले होते. मात्र, तसे झाले नाही. जोपर्यंत ग्रामस्थांसमोर हा विषय सर्वानुमते होत नाही, तोपर्यंत काम होऊ देणार नाही, असा पवित्रा यावेळी घेण्यात आला.

बापूसाहेब धसाळ म्हणाले, प्रकल्पाला आमचा विरोध नाही. परंतु तीन महिन्यापूर्वी झालेल्या उपोषणावेळी ग्रामसभेत जो निर्णय होईल, तेव्हा काम सुरू केले जाईल, असे आश्वासन दिले होते. परंतु ग्रामसभा न घेताच हे काम सुरू करण्यात आले आहे. ही कंपनी खासगी आहे. ती कंपनी महावितरणला वीज विकणार आहे. त्यामुळे त्या कंपनीकडून ग्रामपंचायतीस वार्षिक उत्पन्न सुरू करावे. तसेच ग्रामस्थांना विश्वासात घेऊन या विषयांवर ग्रामसभेत चर्चा करून ठराव करून घ्यावा व मगच काम सुरू करावे, अशी मागणी वंचित बहुजन आघाडीच्या वतीने अनिल जाधव, बापूसाहेब धसाळ, अशोक काळे, नितीन काळे, बाबासाहेब धसाळ, साहेबराव चव्हाण, रमेश जाधव, बाबुराव मकासरे, सागर देशमुख, विजय जाधव, मच्छिंद्र बर्डे, गोविंद ढेरे, गोरक्षनाथ थोरात, विलास जगधने, सुनील जाधव, हरीभाऊ पवार, संजय सूर्यवंशी, चंद्रकांत जगधने आदींनी केली आहे.

दरम्यान, याबाबत डॉ.तनपुरे कारखान्याचे संचालक रवींद्र म्हसे यांनीही ग्रामपंचायतीला लेखी पत्र देऊन ग्रामसभेला विश्वासात घेऊनच हे काम सुरू करावे, यात गावाचे आर्थिक हित साधण्याची मागणी म्हसे यांनी केली आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com