
आरडगाव |वार्ताहर| Aradgav
राहुरी तालुक्याच्या राजकारणात अग्रेसर असणार्या आरडगाव विविध कार्यकारी सहकारी सेवा संस्थेच्या निवडणुकीकरिता जनसेवा मंडळ, परिवर्तन मंडळ जनसेवा व ग्रामविकास मंडळ यांच्यामध्ये तिरंगी लढत होत आहे. शनिवार दिनांक 16 रोजी मतदान होणार आहे. त्यामुळे आता मतदार सत्तेच्या चाव्या कोणाच्या ताब्यात देणार? याचा फैसला तीन दिवसांनंतरच होणार आहे.
दरम्यान, या निवडणुकीत सख्खे भाऊ, दीर-भावजयी, चुलते-पुतणे असा भावकीचा कौटुंबिक राजकीय गुंता निर्माण झाल्याने निवडणुकीला आणखी महत्त्व आले आहे. या निवडणुकीत चुलते-पुतण्यांत आणि दोन सख्ख्या भावांत लढत होणार आहे. तर दीर-भावजयी व दोन चुलतभाऊ एकाच मंडळाकडून निवडणूक लढवित असल्याने सोसायटीच्या या निवडणुकीतील धर्मयुद्ध कोण जिंकणार? याकडे सहकार वर्तुळाचे लक्ष वेधले आहे.
राहुरी तालुक्याच्या राजकारणात आरडगाव सोसायटीचा मोठा नावलौकिक आहे. निवडणुकीच्या पूर्वसंध्येला या सोसायटीच्या राजकीय वर्तुळात मोठ्या घडामोडी घडल्या. त्यामुळे यंदाची ही निवडणूक चांगलीच गाजणार असल्याचे अधोरेखित झाले आहे. सध्या ही सोसायटी जनसेवा मंडळाचे प्रमुख नेते सुनील मोरे प्रणित मंडळाच्या ताब्यात आहे. दरवेळी दुरंगी होणार्या लढतीत दोन्ही बाजूकडील नाराज सभासदांनी सवतासुभा उभा करून चांगला पर्याय दिल्याने निवडणूक चांगलीच गाजत आहे.
परिवर्तन जनसेवा मंडळाकडून अशोक काळे, कैलास झुगे, पोपट झुगे, दत्तात्रय देशमुख, गोविंद धसाळ, सुरेश म्हसे, भास्कर वने, रेवनाथ शेळके, सुलोचना झुगे, हिराबाई झुगे, अरुण जाधव, भारत झुगे, दिलीप भांड हे उमेदवार आहेत.
तर जनसेवा मंडळाकडून जालिंदर काळे, नाथा झुगे, राहुल झुगे, सुनील झुगे, अंकुश देशमुख, शैलेंद्र म्हसे, अर्जुन वने, बाबासाहेब शेळके, प्रमिला झुगे, शोभा झुगे, लक्ष्मण जाधव, सुनील मोरे, कृष्णनाथ भांड हे निवडणूक रिंगणात उतरले आहेत. तसेच ग्रामविकास मंडळाकडून शरद काळे, बाळासाहेब गाडे, गणेश झुगे, प्रकाश बोबडे, मूर्ती म्हसे, रवींद्र म्हसे, राजेंद्र वाघ, विलास शेळके, संगीता म्हसे, मनीषा शेळके, संदीप जाधव, दिलीप म्हसे, अण्णासाहेब भांड आदी उमेदवार आहेत.
आरडगाव विविध कार्यकारी सहकारी सेवा संस्थेचे एकूण 772 सभासद असून शनिवार दि. 16 एप्रिल रोजी मतदान होणार आहे. तिरंगी लढत होत असल्याने सर्वांचे निकालाकडे लक्ष वेधले आहे.