
राहुरी |प्रतिनिधी| Rahuri
राहुरी तालुक्यातील विविध भागात बेसुमार वाळू उपसा सुरू आहे. या वाळू तस्करीतून गुन्हेगारी मोठ्या प्रमाणात वाढली आहे. या वाळू तस्करीतून हाणामारी नित्यनेमाचीच झाली आहे. अशाच प्रकारे वाळू भरण्यास विरोध केल्याच्या कारणावरून सहाजणांनी मिळून महेंद्र शेळके यांना लाथाबुक्क्यांनी तसेच लोखंडी गज व विटाने मारहाण करून जखमी केल्याची घटना घडली.
महेंद्र अशोक शेळके, वय 39 वर्षे रा. शेळके वस्ती, तनपुरे वाडी रोड, राहुरी यांनी राहुरी पोलिसात दिलेल्या फिर्यादीत म्हटले, दि. 1 एप्रिल रोजी रात्री साडेनऊ वाजे दरम्यान राहुरी तालुक्यातील आरडगांव येथे नदीपात्रातील वाळू भरण्यास महेंद्र शेळके यांनी विरोध केला. म्हणून आरोपींनी गैर कायद्याची मंडळी जमा करून महेंद्र शेळके यांना लाथाबुक्क्यांनी तसेच लोखंडी गज व विटाने मारहाण करून जखमी केले. नंतर शिवीगाळ करुन जिवे मारण्याची धमकी दिली.
या घटनेत शेळके यांचा मोबाईल व गळ्यातील चेन गहाळ झाली आहे. शेळके यांच्या फिर्यादीवरून पोलिसांत आरोपी अजय दत्तात्रय चितळकर, अनिकेत सतीश गायकवाड, विकी गायकवाड, ज्ञानेश्वर ईश्वर खिलारी, कुमार सतीश गायकवाड, बंटी गायकवाड सर्व राहणार गौतमनगर, झोपडपट्टी, ता. राहुरी या सहाजणांवर मारहाण व जिवे मारण्याची धमकी दिल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घटनेचा पुढील तपास हवालदार साईनाथ टेमकर हे करीत आहेत.