
राहाता |तालुका प्रतिनिधी| Rahata
राहाता तालुक्यातील आडगाव येथे बिबट्याने हल्ला केल्याने 8 वर्षे वयाचा घोडा ठार झाला आहे.तर रांजणगाव खुर्दला बिबट्याने शेळीचा फडशा पाडला आहे.
आडगाव बुद्रुक येथील बाबासाहेब दत्तू वराडे यांच्या मेंढ्यांसह एक 7 ते 8 वर्षांचा घोडा मोकळ्या जागेत बांधलेला होता. काल मंगळवारी पहाटे 3 वाजता अचानक बिबट्याने या घोड्यावर हल्ला केला. बिबट्याने घोड्याच्या मानेवर हल्ला करून त्याला ठार केले. याशिवाय मागील भागही फस्त केला. हा प्रकार वराडे यांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी या बिबट्याला पिटाळून लावले. मात्र घोड्याचा जीव या बिबट्याने घेतल्याने या गरीब शेतकर्याला आश्रू आवरता आले नाहीत. दरम्यान वनविभागाचे कर्मचारी संजय साखरे यांनी घटना स्थळी भेट देऊन पंचनामा केला आहे.
दरम्यान सदरचा बिबट्या खडकेवाके शिवारात ओढ्याच्या कडेला सावलीत दुपारच्यावेळी काल तो बिबट्या शांत बसल्याचे काही महिलांनी पाहिला असल्याचे समजते.
रांजणगावला शेळी ठार !
दरम्यान सोमवारी रात्री 11 वाजता रांजणगाव खुर्द येथील चैतन्य संजय गोर्डे यांच्या मालकीची शेळी बिबट्याने फस्त केली आहे. त्यांच्या गटनंबर 176 मध्ये पत्र्याच्या शेड मध्ये शेळी बांधलेली होती. बिबट्याने शेळीवर हल्ला करून तीला फस्त केले. वनकर्मचारी संजय साखरे यांनी गोर्डे यांच्या शेडला भेट देऊन शेळीचा पंचनामा केला आहे.