
आरडगाव |वार्ताहर| Aradgav
राहुरी तालुक्यातील राजकीयदृष्ट्या महत्त्वाच्या समजल्या जाणार्या आरडगाव ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये तिरंगी लढत होणार असल्याचे चित्र स्पष्ट असताना अर्ज माघारी घेण्याच्या अंतिम क्षणी एका पॅनलच्या बहुतांशी उमेदवारांनी अचानक अर्ज माघार घेतल्याने एक पॅनल लंगडा झाला तर दुसरीकडे मात्र भाजप आणि राष्ट्रवादी पारंपारिक लढत होणार असल्याचे चित्र याठिकाणी निर्माण झाले.
आरडगाव ग्रामपंचायतीत माजी राज्यमंत्री आमदार प्राजक्त तनपुरे तनपुरे यांच्या राष्ट्रवादी प्रणीत जनसेवा मंडळाच्या गटाची एक हाती सत्ता होती. पारंपारीक विरोधात म्हणून भाजपाचा विखे-कर्डीले गट होता. मात्र, मध्यंतरी पोटनिवडणुकीत वंचितीची एका जागा विजयी झाल्याने वंचितने चांगलाच प्रस्त वाढवत राष्ट्रवादीत गटाशी लढत देण्यास दंड थोपाटले होते. तर पारंपारिक विरोधक म्हणून भाजपाने देखील स्वतंत्र पॅनल उभा केला होता.एकंदरीतच तिरंगी लढत होणार असल्याचे चित्र असताना अर्ज माघारीच्या दिवशी वंचितच्या नेत्याने ठरल्याप्रमाणे आपला सरपंच पदाच्या उमेदवारी मागे न घेतल्याने या अर्ज बाबत एकमत न झाल्याने अंतर्गत खटके उडाले व वंचित बहुजन आघाडीच्या बहुतांशी उमेदवारांनी तडकाफडकी आपले उमेदवारी अर्ज माघारी घेतल्याचे नाराज इच्छुकांनी खासगीत सांगीतले.
वंचित बहुजन आघाडीच्या पॅनलचा नेता हा एकाकी पडल्याचे चित्र निर्माण झाले आहे. त्यामुळे या नेत्याने आपल्या काही उमेद्वारांना घेऊन कसाबसा लंगडा पॅनल उभा केला. यापुर्वी गावात दोन गटात पारंपारीक लढत होत होती. मात्र, दोन्ही गटातील नाराज असलेल्या कार्यकर्त्यांनी आपला स्वतंत्र सावता सुभा तयार करण्याचे ठरवून वंचित आघाडीसोबत जाऊन तिसरी शक्ती तयार केली. परंतू, त्यांच्यात सरपंचपदाच्या उमेद्वारीवरून एकमत न झाल्याने व ठरल्याप्रमाणे वंचित बहुजन आघाडीच्या नेत्याने इतर उमेदवारांना अंधारात ठेवून दगाफटका केल्याचे अर्ज माघारीच्या दिवशी चर्चा सुरू होती. त्यामुळे राष्ट्रवादीत आणि भाजप यांच्यातच प्रमुख दुरंगी लढत होणार असल्याचे चित्र सध्यातरी दिसत आहे.
नाराज गट ‘वेट अँड वॉच’ च्या भूमिकेत
भाजप आणि राष्ट्रवादी या दोन्ही गटामधून नाराज झालेले यांनी वंचित बहुजन आघाडीचा झेंडा हातात घेण्याचे ठरवले होते मात्र यामध्ये देखील दगा-फटका झाल्याने आता या नाराज गटांनी आपले सर्वांचे उमेदवारी अर्ज मागे घेऊन सध्या ते ‘वेट अँड वॉच’ च्या भूमिकेत आहेत. त्यामुळे सध्या तरी शांत बसलेल्या गटाची वादळापूर्वीची तर शांतता नाही ना? असा तर्क-वितर्क काढला जात आहे.