आरडगाव ग्रामपंचायतीत येणार महिलाराज !

निवडणूक दुरंगी की तिरंगी हे अद्याप गुलदस्त्यात
आरडगाव ग्रामपंचायतीत येणार महिलाराज !

आरडगाव |वार्ताहर| Aradgav

राहुरी तालुक्यातील आरडगाव ग्रामपंचायतीच्या पंचवार्षिक निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली असून विरोधक मात्र सत्ताधार्‍यांना पायउतार करण्यासाठी उमेदवारांची जुळवाजुळव करत असल्याचे चित्र दिसून येत आहे. तर सत्ताधारी आपला गड राखून ठेवण्यासाठी कोणता डावपेच आखणार? तसेच ही निवडणूक दुरंगी की, तिरंगी होईल? हे अद्यापतरी गुलदस्त्यातच आहे.

तालुक्याच्या पूर्व भागातील राजकारणात अग्रेसर असणार्‍या आरडगाव या ग्रामपंचायत निवडणुकीत चार प्रभागातून 11 सदस्यांची व जनतेतून सरपंचपदाच्या जागांसाठी निवडणूक होणार आहे. 11 सदस्यांपैकी 6 सदस्य महिला राखीव व सरपंचपद ही सर्वसाधारण स्त्री राखीव असल्याने गावात ‘महिलाराज’ येणार आहे.

निवडणुकीसाठी प्रभाग क्र. 1 मध्ये 865, प्रभाग क्र. 2 मध्ये 791, प्रभाग क्र. 3 मध्ये 804 तर प्रभाग क्र. 4 मध्ये 984 असे एकूण 3444 मतदार मतदानाचा हक्क बजाविणार आहे. यामुळे सत्तेसाठी चांगलीच रस्सीखेच पहायला मिळणार आहे. अनेक इच्छुकांनी उमेद्वारीसाठी देव पाण्यात ठेवले आहे. त्यामुळे चालू पंचवार्षिक निवडणुकीत सत्तेत संधी मिळण्यासाठी अनेक इच्छुक तयारीला लागले आहेत. तर समर्थक कार्यकर्त्यांची इच्छाशक्ती आणि उमेदवारीसाठी आग्रह वाढत चालल्याने गाव पुढार्‍यांना चांगलीच डोकेदुखी ठरणार आहे. तसेच अनेकांनी हौसी मतदारांचे चोचले पुरविण्यास सुरुवात केली आहे.

गत पंचवार्षिक निवडणुकीत तनपुरे गटाने बहुमत मिळवून सरपंचपदासह सत्ता मिळविली होती. गेल्या पाच वर्षांत गावातील विकासाचा मुद्दा हा कळी ठरणार आहे. या कालखंडात गावातील अनेक प्रश्न प्रलंबित असल्याची चर्चा विरोधक कट्ट्यावर बसून करत आहेत. तर सत्ताधारी आपण पाच वर्षांत केलेल्या विकासकामांचा लेखाजोखा मांडत आहेत. गावात गेल्या अनेक वर्षांपासून दोन गटांत पारंपरिक लढत होत असते. मात्र, या निवडणुकीत तिसरी शक्ती उदयास येण्याची शक्यताही वर्तवली जात आहे.

यादृष्टीने गावात हालचालींना वेग आला आहे. मागील निवडणुकीत असलेल्या प्रभागनिहाय आरक्षणात या निवडणुकीत उलथापालथ झाल्याने अनेकांचा हिरमोड झाला आहे. तर काही गटात सरपंचपदाच्या उमेद्वारीसाठी रस्सीखेस सुरू आहे. तर पार्टीचे प्रमुख समोरच्या उमेदवारीचा अंदाज घेऊन अनेक पर्यायाच्या शोधात आहेत. तसेच अनेकांची नाराजी दूर करण्यातही नेते मंडळींची दमछाक होत आहे. तर काहींनी आपल्या उमेदवारीसाठी तालुक्यातील नेतृत्वाकडून फिल्डींग लावल्याचे समजते. या निवडणुकीत पार्टीचे प्रमुख उमेदवारी देताना सो-धा (सोयरे-धायरे) पॅटर्नचा अभ्यास करीत आहेत.

दोन्ही गटांचा सवतासुभा...

नुकत्याच झालेल्या सहकारी सोसायटीच्या निवडणुकीत तनपुरे गटात दोन गट पडून तसेच विरोधी विखे व कर्डिले गटाचे समर्थक एकत्र येऊन एका तनपुरे गटाकडून निवडणूक लढविली होती. मात्र, आता या निवडणुकीत विखे व कर्डिले गटाने सवतासुभा केला आहे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com