
संगमनेर |वार्ताहर| Sangamner
शिक्षक भरतीसाठी राज्य सरकारने हालचाल सुरू केली आहे. तथापि शिक्षक होण्यासाठी शिक्षक पात्रता परीक्षा उत्तीर्ण होणे आवश्यक आहे. त्यानंतर अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी देखील उत्तीर्ण होण्याची आवश्यकता आहे. मात्र गेले पाच वर्ष अभियोग्यता चाचणीचे नियोजन सरकारच्या वतीने करण्यात आलेली नव्हते. त्यामुळे उमेदवारांमध्ये अस्वस्थता निर्माण झाली होती. ही बाब लक्षात घेऊन अखेर महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या वतीने 22 फेब्रुवारी ते 3 मार्च या कालावधीमध्ये परीक्षा घेण्याचे नियोजन जाहीर केले आहे. त्यामुळे शिक्षक भरतीसाठी इच्छुक असलेल्या उमेदवारांना भरती प्रक्रियेस सामोरे जाणे शक्य होणार आहेत.
राज्य सरकारने येत्या काही दिवसात 30 हजार शिक्षकांची पदे भरण्यासंदर्भात कारवाई करण्यात येणार असल्याचे सूचित केले आहेत त्यामुळे राज्यात शिक्षक पात्रता परीक्षा उत्तीर्ण असलेल्या सुमारे 84 हजार विद्यार्थ्यांनी प्रयत्न सुरू केले होते. मात्र अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी नियोजन शासनाकडून करण्यात आल्यामुळे अनेक विद्यार्थ्यांना शासकीय सेवेत येण्यास अडचण निर्माण होणार्या अखेर परीक्षा जाहीर झाल्यामुळे विद्यार्थ्यांचा जीव भांड्यात पडला आहे.
ही परीक्षा विद्यार्थ्यांना मराठी, उर्दू व इंग्रजी अशा तीनही भाषेत देता येणार आहेत. परीक्षेसाठी अर्ज भरू इच्छिणारे विद्यार्थी हे भारतीय नागरिक असले पाहिजेत. शासनाने निर्धारित केली वयाची अट पूर्ण केली असले पाहिजेत. तसेच अपेक्षित शैक्षणिक व्यावसायिक पात्रता धारण करणारे उमेदवारच परीक्षेसाठी प्रविष्ट होऊ शकणार आहेत. परीक्षेसाठी खुल्या संवर्गातील विद्यार्थ्यांना 950 रुपये, आर्थिक दृष्ट्या दुर्बल, अनाथ, दिव्यांग उमेदवारासाठी 850 रुपये भरावे लागणार आहेत. सदरचे परीक्षा शुल्क हे ना परतावा स्वरूपातील असणार आहेत. परीक्षेसाठी केंद्राची निवड करताना प्रत्येक विद्यार्थ्याला तीन परीक्षा केंद्राची निवड करावी लागणार आहेत. अशा केंद्रावर विद्यार्थी संख्या पुरेशा प्रमाणात झाल्यानंतर एखाद्या उमेदवाराला जिल्हा अथवा परिक्षा केंद्र दुसर्या जिल्ह्यात अथवा दुसर्या परीक्षा केंद्रावर देण्यात येणार आहेत.
200 मार्काची होणार परीक्षा
अभियोग्यता बुद्धिमत्ता या विषयासाठीची परीक्षा निर्धारित करताना अभियोग्यतेसाठी 120 गुण व बुद्धिमत्तेसाठी 80 गुण राखून ठेवण्यात आले आहेत. प्रत्येक प्रश्नासाठी एक गुण असणार आहे.विद्यार्थ्यांना 200 गुणांसाठी 200 प्रश्न सोडवावे लागणार आहेत. अभियोग्यतेसाठी गणितीय क्षमता, भाषिक क्षमता, अवकाशीय क्षमता, कल ,आवड, समायोजन ,व्यक्तिमत्व इत्यादी उपघटकांचा समावेश असणार आहे. बुद्धिमत्ता विषयासाठी आकलन ,वर्गीकरण ,सहसंबंध, क्रम, श्रेणी ,तर्क व अनुमान, सांकेतिक भाषा ,लयबद्ध मांडणी इत्यादी उपघटकाचे समावेश असणार आहे.
परीक्षेसाठी असे आहे नियोजन
महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या वतीने अभियोग्यता व बुद्धीमत्ता चाचणीसाठी नियोजन जाहीर करण्यात आले आहे.त्यानुसार ऑनलाइन अर्ज सादर करण्यासाठी 31 जानेवारी ते 8 फेब्रुवारी असा कालावधी निश्चित करण्यात आला आहे. परीक्षा शुल्क 8 फेब्रुवारी पर्यंत उमेदवारांना भरता येणार आहे. प्रवेश पत्र ऑनलाइन स्वरूपात प्राप्त करून घेण्यासाठी 15 फेब्रुवारीपासून सुरुवात होईल. ऑनलाईन परीक्षा 22 फेब्रुवारी ते तीन मार्च अशा कालावधीमध्ये निर्धारित करण्यात आली आहे. तथापि प्रविष्ट होणारे विद्यार्थी संख्या व उपलब्ध विद्यार्थी सुविधा लक्षात घेऊन या नियोजनामध्ये बदल होण्याची शक्यताही वर्तवण्यात आली आहे.
हे असेल आरक्षण
भरतीची प्रक्रिया करत असताना आर्थिक, सामाजिक आरक्षण शासन निर्णयानुसार देण्यात येणार आहेत. आर्थिक दुर्बल, खेळाडू ,दिव्यांग ,अनाथ, माजी सैनिक ,प्रकल्पग्रस्त ,भूकंपग्रस्त अशा प्रकारची आरक्षण देण्यात येणार आहेत.