पाथर्डी (तालुका प्रतिनिधी) -

तालुक्याची कामधेनू असलेल्या श्री वृद्धेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या अध्यक्षपदी माजी आमदार आप्पासाहेब राजळे यांची एकमताने

फेरनिवड करण्यात आली. तर उपाध्यक्षपदी रामकिसन काकडे यांची फेरनिवड करण्यात आली.

प्रांताधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी देवदत्त केकाण यांच्या अध्यक्षतेखाली नूतन संचालक मंडळाची बैठक शुक्रवारी सकाळी 11 वाजता आदीनाथनगर येथे डॉ. अण्णासाहेब शिंदे सभागृहात झाली. चेअरमनपदासाठी राजळे यांच्या नावाची सूचना ज्येष्ठ संचालक उद्धवराव वाघ यांनी मांडली. बाबासाहेब किलबिले यांनी अनुमोदन दिले.व्हाईस चेअरमन पदासाठी काकडे यांच्या नावाची सूचना सुभाष बुधवंत यांनी मांडली. सुभाष ताठे यांनी अनुमोदन दिले. राज्य साखर कामगार संघ, कारखान्याचा प्रशासन विभाग यांच्यावतीने नूतन पदाधिकार्यांचा निवडीनंतर सत्कार करण्यात आला.

ऊस उत्पादक शेतकरी सभासदांनी सहा वेळा कारखाना निवडणूक बिनविरोध करून संचालक मंडळाचे कामकाजाप्रती सार्वत्रिक विश्वास व्यक्त केला. विकासासह नकळत केलेल्या स्नेहभावाचा हा ओलावा आहे. वृद्धेश्वर उद्योग समूह एक विशाल कुटुंब आहे. सभासद केंद्रबिंदू मानून त्यांच्या पाल्यांसाठी शैक्षणिक सुविधा देऊ, नियोजित इथेनॉल उपपदार्थ निर्मिती प्रकल्प निर्धारीत वेळेत पूर्ण केला जाईल, अशी ग्वाही चेअरमन आप्पासाहेब राजळे यांनी याप्रसंगी दिली.

कारखान्याच्या नूतन संचालिका आमदार मोनिकाताई राजळे, सिंधुताई जायभाय, संचालक राहुल राजळे, काकासाहेब शिंदे, बाळासाहेब गोल्हार, शरद अकोलकर, कुशीनाथ बर्डे, अनिल फलके, श्रीकांत मिसाळ, सहाय्यक निवडणूक अधिकारी रमेश ससाणे, कार्यकारी संचालक जालिंदर पवार आदी उपस्थित होते. सरव्यवस्थापक भास्करराव गोरे यांनी आभार मानले.

वृद्धेश्वर कारखाना बिनविरोध निवडणुकीचा आदर्श राज्यासाठी आयडॉल आहे.सहकारी तत्त्वावरील साखर कारखाने व इतर उद्योगांसाठी सभासदांचा कृती उपक्रम पथदर्शी असून सभासद कामगारांच्या सार्वत्रिक हिताची जपवणूक करणारा आहे.

- नितीन पवार, सरचिटणीस राष्ट्रीय साखर कामगार संघटना