पोलीस अधिकार्‍यांच्या अंगावर ट्रक घालण्याचा प्रयत्न

पोलीस अधिकार्‍यांच्या अंगावर ट्रक घालण्याचा प्रयत्न

केडगाव बायपास चौकातील घटना

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

कोतवाली पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक रवींद्र पिंगळे यांच्या अंगावर ट्रक घालण्याचा प्रयत्न अहमदनगर-पुणे महामार्गावर केडगाव बायपास चौकात शनिवारी सकाळी घडला. पिंगळे यांनी स्वत: चा जीव वाचविण्यासाठी ट्रकच्या समोरील भागावर असलेल्या शिडीवर उडी मारून चढल्यामुळे ते थोडक्यात बचावले व मोठा अनर्थ टळला. याप्रकरणी कोतवाली पोलीस ठाण्यामध्ये ट्रक चालकाविरूद्ध अदखलपात्र गुन्हा दाखल करून मोटार व्हेईकल कायद्यांतर्गत कारवाई करण्यात आली आहे.

मोहम्मद इरशाद मोहम्मद हमीदा (रा. खानपूर घाटी, हरियाणा) हा त्याच्या ताब्यातील ट्रक घेवुन पुण्याच्या दिशेने चाललेला होता. कोरेगाव भीमा येथील कार्यक्रमामुळे नगर-पुणे वाहतूक व्यवस्थेतमध्ये बदल करण्यात आलेला होता. त्यामुळे ट्रक चालकास पुण्याच्या दिशेने जाण्यास मनाई करण्यात आली. सहायक निरीक्षक पिंगळे यांनी त्याला दुसर्‍या बाजूने जाण्याचे सांगितले. मात्र चालकाने ट्रकचा वेग वाढवून पुण्याच्या बाजूने पलायन केले. पिंगळे यांनी दुसर्‍या वाहनाने त्याच्या ट्रकपुढे जाऊन ट्रकला अडविण्याचा प्रयत्न केला.

मात्र संबंधीत ट्रक चालकाने पिंगळे यांच्या दिशेने जोरदार ट्रक नेण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे पिंगळे हे स्वत: चा जीव वाचविण्यासाठी ट्रकच्या समोरच्या भागावर असलेल्या शिडीवर उडी मारून चढले, यामुळे मोठा अनर्थ टळला. ट्रक चालकाविरूद्ध अदखलपात्र गुन्हा दाखल करून मोटार व्हेईकल कायद्यांतर्गत कारवाई करण्यात आली असल्याचे पोलिसांनी सांगितले.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com