सहायक पोलीस निरीक्षकांना करोनाची लागण
सार्वमत

सहायक पोलीस निरीक्षकांना करोनाची लागण

Arvind Arkhade

अहमदनगर|प्रतिनिधी|Ahmednagar

शहर पोलीस दलातील एका सहायक पोलीस निरीक्षकाचा करोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. काही दिवसांपूर्वी या निरीक्षकाची पत्नी, मुलगा, मुलगी व मातोश्री यांना संसर्ग झाला होता. सुरुवातीला निरीक्षकाचा अहवाल निगेटिव्ह आला होता. दुसर्‍या चाचणीत मात्र त्यांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. पोलिसांसाठी पोलीस मुख्यालयात सुरू केलेल्या स्वतंत्र कोविड सेंटरमध्ये या निरीक्षकांवर उपचार सुरू आहेत.

काही दिवसांपूर्वी लाचलुचपत प्रतिबंधक विभागातील एका निरीक्षकाचा करोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आला होता. या निरीक्षकांच्या घराशेजारी शहर पोलीस दलातील या सहायक निरीक्षकांचे घर आहे. ‘लाचलुचपत’ निरीक्षकांच्या घरी वाढदिवसाच्या कार्यक्रमाला सहायक निरीक्षकांच्या कुटुंबाने हजेरी लावली होती.

या वाढदिवसानंतर ‘लाचलुचपत’च्या निरीक्षकाचा अहवाल पॉझिटिव्ह आल्याने शहर पोलीस दलातील सहायक निरीक्षकांसह त्यांचे कुटुंब होम क्वारंटाईन झाले होते. यानंतर त्यांच्या घशाचे स्त्राव तपासणीसाठी पाठविण्यात आले होते. यामध्ये सहायक निरीक्षकांच्या कुटुंबातील सर्वांचे करोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आले होते. मात्र सहायक निरीक्षकाचा अहवाल निगेटिव्ह आला आहे.

कुटुंबातील सर्व सदस्यांवर उपचार सुरू करण्यात आले. निरीक्षकांचा स्त्राव पुन्हा तपासणीसाठी पाठविला होता. त्यांचा अहवाल प्राप्त झाला असून यामध्ये ते करोना पॉझिटिव्ह निघाले. सध्या त्यांच्यावर पोलीस मुख्यालयातील कोविड सेंटरमध्ये उपचार सुरू आहेत. दरम्यान, पोलीस दलातील सहायक निरीक्षकांचा पोलीस ठाण्याशी संपर्क झाला नसल्याने ठाण्यातील इतरांना याचा काही धोका नसल्याचे समजते.

Deshdoot
www.deshdoot.com