श्रीरामपूर नगरपालिकेकडून 247 कर्मचार्‍यांना आरोग्य विम्याचे कवच - नगराध्यक्षा आदिक

श्रीरामपूर नगरपालिकेकडून 247 कर्मचार्‍यांना आरोग्य विम्याचे कवच - नगराध्यक्षा आदिक
अनुराधा आदिक

श्रीरामपूर |प्रतिनिधी| Shrirampur

गेल्या वर्षभरापासून करोना काळात श्रीरामपूर नगरपालिकेचे सर्वच कर्मचारी रात्रंदिवस सेवा बजावत आहेत. स्वतःचा जीव धोक्यात घालून हे कर्मचारी काम करीत आहेत. त्यामुळे पालिकेने 247 कर्मचार्‍यांना 2 लाख रुचे आरोग्य विम्याचे कवच दिले आहे. यासाठी 4, 56, 750 रुपये नगरपालिका फंडातून खर्च करण्यात आले आहेत, अशी माहिती नगराध्यक्षा अनुराधाताई आदिक व मुख्याधिकारी गणेश शिंदे यांनी दिली.

गेल्या वर्षभरापासून श्रीरामपूर शहर व तालुक्यावर करोनाचे संकट घोंघावत आहे. करोनाच्या या जीवघेण्या संकटाशी सामना करण्यासाठी श्रीरामपूर शहरात अनेक कोविड हॉस्पिटल सुरू झाली असून, सद्य परिस्थितीत नगरपरिषदेच्या काविड केअर सेंटरमार्फतही करोनाबाधित रुग्णांना सेवा देणेत येत आहे. पालिकेच्या पुढाकारातून सुरू झालेल्या कोविड केअर सेंटरमध्ये पालिकेचे कर्मचारी रात्रंदिवस वेगवेगळ्या प्रकारची सेवा बजावत आहेत. आरोग्य विभागातील कर्मचारी, सफाई कामगार तर आपला जीव धोक्यात घालून वर्षभरापासून आपले कर्तव्य बजावत आहेत, परंतू, करोनाच्या दुसर्‍या लाटेत रुग्णवाढीचा वेग अधिक आहे. अशा स्थितीतही जीव मुठीत धरून सोपविलेली कामगिरी बजावणार्‍या पालिका कर्मचार्‍यांनाही करोनाची लागण झालेली आहे.

नगराध्यक्षा अनुराधा आदिक व मुख्याधिकाऱी गणेश शिंदे यांनी तातडीने सकारात्मक पाऊल उचलत मनिपाल सिगमा इन्शुरन्स कंपनीच्या माध्यमातून नगरपरिषदेमार्फत एकूण 247 कर्मचार्‍यांचा 2 लाख रुपयांचा आरोग्य विमा उतरविणेत आलेला आहे . हा सर्व खर्च पालिकेने केला असून यामुळे नगरपरिषदेच्या प्रत्येक कर्मचार्‍यास करोना व इतर सर्व आजारांसाठी रु.2, 00, 000/- रक्कमेचे विमा कवच लाभणार आहे. पालिकेचे कर्मचारी म्हणजे आमचा कणा, त्यांचे संरक्षण ही आमची जबाबदारी आहे, असे प्रतिपादन नगराध्यक्षा अनुराधाताई आदिक यांनी केले.

कोणत्याही संस्थेचे कर्मचारी म्हणजे त्या संस्थेचा कणाच असतात. कर्मचार्‍यांच्या जीवावरच संस्था टिकून असते. पालिकेचे कर्मचारीदेखील आमच्यासाठी कणाच आहेत. त्यामुळे त्यांना आरोग्य कवच देऊन त्यांचे संरक्षण करणे ही आमची जबाबदारी आहे. करोना महामारीच्या काळात आमच्या कर्मचार्‍यांना विमा संरक्षण मिळवून देणे ही आमची जबाबदारी आहे. आमचे कर्मचारी म्हणजे आमच्याच कुटुंबातील सदस्य आहेत, या भावनेतून पालिकेच्या खर्चातून सर्वांचा विमा उतरविला आहे, याकामी पालिकेच्या सर्व सदस्यांचे व मुख्याधिकारी यांचे मोलाचे सहकार्य लाभले, असेही त्या म्हणाल्या.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com