श्रीरामपुरात रंगली चर्चा राजकीय क्षमापनेची

श्रीरामपुरात रंगली चर्चा राजकीय क्षमापनेची

श्रीरामपूर |प्रतिनिधी| Shrirampur

काल जैन समाजाचा क्षमापनेचा दिवस होता. त्यानिमित्त जैन स्थानकात सगळ्यांनी एकत्र येऊन गेल्या वर्षभरात काही चुकले असेल तर माफी मागितली. त्यानिमित्त आयोजित कार्यक्रमात सर्वच पक्षाचे राजकीय मान्यवर यावेळी उपस्थित होते. यावेळी माजी नगराध्यक्षा अनुराधा आदिक यांनी माझ्या वडिलांच्या पाठित खंजिर खुपसणार्‍यांनाही माझ्या वडिलांनी माफ केल्याचे सांगितले तर माजी सभापती डॉ. वंदना मुरकुटे यांनी मी माझ्या सासर्‍यांची (माजी आ. भानुदास मुरकुटे) माफी मागते, असे सर्वासमोर सांगितले. या माफीनाम्याची चर्चा काल जैन स्थानकातच नव्हे तर श्रीरामपूर शहरात चांगलीच रंगली.

काल (गुरुवारी) जैन समाजाचा क्षमापनेचा दिवस होता. त्यानिमित्त जैन स्थानकात जैन बांधवांबरोबरच अनेक राजकीय मंडळीही एकत्र जमले. या कार्यक्रमासाठी विश्वदर्शनाजी म. सा. व तिलकदर्शनाजी म.सा. यांच्यासह खा. सदाशिव लोखंडे, आ. लहू कानडे, माजी आ. भानुदास मुरकुटे, माजी नगराध्यक्षा अनुराधा आदिक, उपनगराध्यक्ष करण ससाणे, माजी सभापती डॉ. वंदना मुरकुटे, भाजपाचे प्रकाश चित्ते, युवा नेते सिध्दार्थ मुरकुटे, साई संस्थानचे विश्वस्त सचिन गुजर, काँग्रेसचे शहराध्यक्ष संजय छल्लारे, माजी उपनगराध्यक्ष श्रीनिवास बिहाणी, अशोक उपाध्ये, रमण मुथ्था, अशिष धनवटे, मंजुश्री मुरकुटे, लकी सेठी, किरण लुणिया, रमेश कोठारी आदींसह अनेक मान्यवर उपस्थित होते. सर्वांनी गेल्या वर्षभरात काही चुकले असेल तर माफी मागितली.

यावेळी खा. लोखंडे, आ. कानडे व माजी आ. भानुदास मुरकुटे यांच्यासह राजकीय मान्यवर या क्षमापना दिनानिमित्त आपल्याकडून झालेल्या चुकांबद्दल क्षमापना करत होते. यावेळी माजी नगराध्यक्षा अनुराधा आदिक म्हणाल्या की, माझे वडील स्व. गोविंदराव आदिक यांनी श्रीरामपुरात खूपच विकासाची कामे केली. मात्र माझ्या वडिलांच्या पाठित काहींनी खंजिर खुपसला होता. ज्यांनी माझ्या वडिलांच्या पाठित खंजिर खुपसला त्यांनाही माझ्या वडिलांनी माफ केले, मीही त्यांना माफ करते असे आदिक म्हणाल्या.

अनुराधा आदिक यांच्या क्षमापनेनंतर पंचायत समितीच्या माजी सभापती डॉ. वंदना मुरकुटे यांनीही तोच धागा पकडत त्यांचे सासरे माजी आ. भानुदास मुरकटे यांची माफी मागितली. अशोक कारखान्याच्या निवडणुकीत मुरकुटे घराण्याचा वाद चव्हाट्यावर आला होता. त्यावेळी माझ्याकडून माझे सासरे माजी आ. भानुदास मुरकुटे यांच्याविषयी काही अनुचीत बोलले असेल यातून त्यांचे मन दुखावले गेले असेल तर मी त्यांची सर्वांसमोर माफी मागते,असे त्या म्हणाल्या. या दोन्ही माफीनाम्याची काल दिवसभर शहर व तालुक्यात चांगलीच चर्चा रंगली.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com