‘अँटिक’च्या नावाखाली लुटण्याचा डाव फसला

टोळीचा पर्दाफाश । पाचजणांवर गुन्हा, चौघांना अटक
‘अँटिक’च्या नावाखाली लुटण्याचा डाव फसला

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

अँटिक आर्टिकल (मौल्यवान वस्तू) विकत घेण्यासाठी 50 लाख रूपये कंपनीमध्ये गुंतवल्यास 101 कोटी रूपये मिळतील, असे आमिष दाखवून नगरच्या व्यापार्‍याची फसवणूक करणार्‍या टोळीचा पोलिसांनी पर्दाफाश केला. स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी पुणे शहरातील विमाननगर परिसरात ही कारवाई केली.

याप्रकरणी कोतवाली पोलीस ठाण्यात पाच जणांविरोधात गुन्हा दाखल केला असून चौघांना अटक केली आहे. आण्णासाहेब रामभाऊ म्हस्के (वय 58 रा. सारसनगर, नगर), धमेंद्र जगदीश पासवान (वय 45 रा. ग्राम बारासोलापुर, बिहार), समीर मन्सूर मुल्ला (वय 39 रा. मिरज जि. सांगली), शेख अकील सुलतान (वय 42 रा. भाळवणी ता. पारनेर) अशी अटक केलेल्यांची नावे असून फिरज शेख (रा. टेंभुर्णी जि. सोलापूर) पसार झाला आहे. नगर शहरातील कापड व्यापारी निखिल लुणे यांना त्यांच्या मित्राने अण्णासाहेब म्हस्के यांची ओळख करून दिली. म्हस्के यांनी फिरज शेख यांच्याकडे अँटिक वस्तू आहेत, त्या वस्तू विकत घेण्यासाठी 50 लाख रूपये लिओ मेटल टेक्नो प्लॅन बेस्ट कंपनीमध्ये गुंतवणूक केले तर सदरची कंपनी 101 कोटी रूपये देते, असे लुणे यांना सांगितले.

शेख याने लुणे यांना 50 लाख रूपये घेऊन पुणे येथील विमाननगर परिसरातील एका हॉटेलमध्ये बोलविले. आपली फसवणूक होईल, अशी शंका लुणे यांना आली. त्यांनी स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांना याबाबत माहिती दिली. स्थानिक गुन्हे शाखेचे पथक लुणे यांच्यासोबत पुणे येथे गेले. त्यांनी हॉटेलच्या बाहेर सापळा लावला. लुणे तेथे गेल्यानंतर तेथे शेख नावाचा व्यक्ती आलाच नाही. त्याच्या जागी पासवान नावाचा व्यक्ती तेथे आला. त्याने लुणे यांच्याकडे पैशाची मागणी केली. बाहेर थांबलेल्या पोलिसांना लुणे यांनी इशारा करताच पोलिसांनी म्हस्के व पासवान यांना अटक केली. इतर दोघांना पोलिसांनी नगरमधून अटक केली. आरोपीकडून बँकेचे चेक बुक, मोबाईल, कंपनीचे लेटरहेड, शिक्के असा सुमारे पाच लाखांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

Related Stories

No stories found.