
पारनेर |तालुका प्रतिनिधी| Parner
विश्वस्त व कार्यकर्त्यांकडून संघटना वाढीसाठी कोणत्याही प्रकारचे प्रयत्न होत नसल्याने भ्रष्टाचार विरोधी जनआंदोलन (Anti-corruption Mass Movement) बरखास्त करा, अशी सूचना पद्मभूषण ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे (Anna Hazare) यांनी पत्राद्वारे केली आहे. सरकारवर अंकुश ठेवण्यासाठी सामाजिक संघटनेत नवीन कार्यकर्ते तयार होत नसल्याने आंदोलन नावाच्या संस्थेचा उपयोग काय? असा सवालही त्यांनी केला आहे.
गेल्या 25 वर्षांपासून सरकारवर अंकुश ठेवण्याचे काम भ्रष्टाचार विरोधी जनआंदोलन (Anti-corruption Mass Movement) न्यास ही विश्वस्त संस्था करत आहे. संस्थेचे संस्थापक अध्यक्ष अण्णा हजारे (Anna Hazare) आहेत. त्यांनी संस्थेच्या विश्वस्तांना दोन महिन्यांपूर्वी (25 फेब्रुवारी) पत्र पाठवले आहे. त्यात म्हटले आहे, की आता माझे वय झाले. वयाच्या 85 व्या वर्षी काम करण्यात मर्यादा येत आहेत. विश्वस्त, तसेच कार्यकर्त्यांकडून संघटना वाढवण्यासाठी कोणत्याही प्रकारचे प्रयत्न होत नाहीत. संस्थेच्या सर्वसाधारण बैठकीत भ्रष्टाचार विरोधी जनआंदोलन न्यास ही संस्था बरखास्त करावी, अशी सूचना हजारे यांनी पत्रात केली होती.
विश्वस्तांना पाठवलेल्या पत्रात हजारे (Anna Hazare) यांनी म्हटले, की राज्यातील 35 जिल्हे आणि 252 तालुक्यांत वेळोवेळी दौरे करून मोठ्या कष्टाने भ्रष्टाचार विरोधी आंदोलनाचे संघटन उभे केले. त्यानंतर वेळोवेळी मोठी आंदोलने झाली. त्यातून जनहिताचे 10 कायदे झाले. कोट्यवधी रुपये खर्च करून झाले नसते. एवढे लोकशिक्षण, लोकजागृती झाली. पण खंत याची वाटते की आंदोलन (Movement) नावाने आपण संस्था व संघटना चालवत असताना, किरकोळ अपवाद वगळता आंदोलन (Movement) कुठेच दिसत नाही. त्यासाठी कुणी प्रयत्न करतानाही दिसत नाही. त्यामुळे आता असे वाटते की, गेल्या 40 वर्षात जे झाले तेवढे पुष्कळ झाले. ही भ्रष्टाचार विरोधी जनआंदोलन संस्था बरखास्त करावी.
सभेत बरखास्तीबाबत कोणताही निर्णय नाही...
हजारे यांनी 29 जानेवारी रोजी झालेल्या विश्वस्त मंडळाच्या बैठकीत बरखास्तीबाबात स्पष्ट केले होते. त्या बैठकीत 26 फेब्रुवारी रोजी न्यासाची सर्वसाधारण सभा घेण्याचा निर्णय घेण्यात आला. सर्वसाधारण बैठकीत हजारे यांनी संस्थेबाबत निर्णय घ्यावा, अशी विनंती विश्वस्तांनी केली होती. मात्र, 26 फेब्रुवारी रोजी झालेल्या सभेत बरखास्तीबाबत कोणताही निर्णय झाला नसल्याचे समजते.