पुढील आठवड्यात ‘अवघड’ शाळा होणारी घोषणा

जिल्हा परिषद : गुरूजींच्या बदली प्रक्रिया होणार सुरू
पुढील आठवड्यात ‘अवघड’ शाळा होणारी घोषणा

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

प्राथमिक शिक्षकांच्या बदल्यांची प्रक्रिया राबविण्यासाठी आवश्यक असणार्‍या अवघड क्षेत्रातील शाळांची निवड आता अंतिम टप्प्यात आहे. मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली असणार्‍या समितीने अवघड क्षेत्रातील निवडीची प्रक्रिया जवळपास पूर्ण केली असून पुढील आठवड्यात जिल्ह्यातील अवघड क्षेत्रातील शाळांची यादी जाहीर होण्याची शक्यता जिल्हा परिषद प्रशासनाकडून देण्यात आली.

नक्षलग्रस्त अथवा पेसा गाव क्षेत्रात असणार्‍या प्राथमिक शाळा, वार्षिक सरासरी पर्जन्यमान 2 हजार मिलीमीटरपेक्षा जास्त किंवा नैसर्गिक आपत्तीने सातत्याने संपर्क तुटणारी गावे, हिस्त्र वन्य प्राणी उपद्रव असणारा जंगल प्रदेश, वाहतूकीच्या सुविधांचा अभाव असणारे गावे, तसेच वाहतूक योग्य रस्त्यांचा अभाव, रस्त्याने न जोडलेल्या शाळा (बस, रेल्वे आणि अन्य सार्वजनिक वाहतूक), संवाद छायेचा प्रदेश (बीएसएनएलचा अहवालानूसार), डोंगरी भाग प्रदेश (नियोजन विभागाचा शासन निर्णय) राष्ट्रीय, राज्य मार्गापासून दहा किलो मीटर पेक्षा जास्त दूर असणार्‍या गावातील शाळांचा समावेश अवघड क्षेत्रातील शाळांमध्ये समावेश होतो.

या अटी पूर्ण करणार्‍या गावांची सार्वजनिक बांधकाम (राज्य सरकार) यांच्यासह वन्य विभाग, महसूल विभाग, बीएसएन विभाग यांच्याकडील अहवालानूसार यादी घेवून त्यांचा अवघड क्षेत्रात समावेश करण्यात येतो. यासाठी जिल्हा परिषद पातळीवर मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली समिती असून त्यात उपजिल्हाधिकारी निवडणूक, कार्यकारी अभियंता जि.प. बांधकाम विभाग, कार्यकारी अभियंता सार्वजनिक बांधकाम विभाग, विभाग नियंत्रक एसटी विभाग आणि शिक्षणाधिकारी हे सदस्य असतात. नगर जिल्हा परिषदेने अवघड क्षेत्रातील शाळांची निवड अंतिम केली असून पुढील आठड्यात अवघड क्षेत्रातील शाळांची घोषणा करण्यात येणार आहे. या अवघड क्षेत्रातील शाळेतील तीन वर्षे सेवा देणार्‍या प्राथमिक शिक्षकांना प्राधान्यांने बदली प्रक्रिय सहभाग घेवून बदली करून घेता येते.

सुमारे 300 गावांचा सामावेश

जिल्ह्यातील सुमारे 275 ते 300 गावांचा अवघड क्षेत्रातील शाळांमध्ये समावेश होण्याची शक्यता आहे. यासाठी विविध विभागाकडील अहवाल, बीएसएन विभागाकडील संवाद छायेच्या प्रदेशाची यादी यांचा आधार घेवून अवघड क्षेत्रातील गावांची निवड करण्यात येणार आहे. एकदा अवघड क्षेत्रात निवड झालेल्या गावाची दर 3 वर्षांनी पुनर्विलोकन करण्यात येते.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com