अण्णा हजारेंची प्रकृती ठणठणीत, राळेगणमध्ये दाखल

अण्णा हजारेंची प्रकृती ठणठणीत, राळेगणमध्ये दाखल

पारनेर l तालुका प्रतिनिधी

जेष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांना नियमित तपासणीसाठी गुरुवार (दि २५ नोव्हेंबर २०२१) रोजी रुबी हॉल क्लिनिकमध्ये दाखल केले होते. गुरुवारी व शुक्रवारीच्या सर्व तपासण्याचे अहवाल नॉर्मल आल्यावर डॉ. परवेझ ग्रँट यांच्या टिमने अण्णांना राळेगणला जाण्याचा सल्ला दिला. त्या अनुषंगाने अण्णा शुक्रवारी ठणठणीत बरे होऊन सुखरूप राळेगणमध्ये पोहचले .

ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे हे पूर्वनियोजित कार्यक्रमानुसार काल नियमित वैद्यकीय तपासणीसाठी रुबी हॉल क्लिनिकला दाखल झाले होते. काल सर्व मुख्य तपासण्या करण्यात आल्या होत्या. उर्वरित तपासण्या आज शुक्रवारी सकाळी करण्यात आल्या. सर्व तपासण्यांचे अहवाल नॉर्मल आले असल्याने वयाच्या ८५ व्या वर्षीही अण्णा पूर्णपणे तंदुरुस्त असल्याचे डॉ. परवेझ ग्रँट आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी सांगीतले आहे. नियोजित सर्व तपासण्या पूर्ण झाल्याने डॉक्टरांनी अण्णांना राळेगणला जाण्यास परवानगी दिली. त्यानुसार आण्णा राळेगणमध्ये दाखल झाले आहेत.

दरम्यान अण्णा हजारे रुग्णालयात दाखल झाल्याच्या बातम्या पसरल्यानंतर उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांच्यासह अनेक मान्यवरांनी दूरध्वनीद्वारे अण्णांच्या प्रकृतीची आस्थेने चौकशी केली. अण्णांच्या सोबत स्वयंसेवक श्यामकुमार पठाडे व संदीप पठारे होते .

अण्णांना रुग्णालयातून निरोप देण्यासाठी रुबी हॉल क्लिनिकची संपूर्ण टिम उपस्थित होती. डॉ. परवेझ ग्रँट, डॉ. मखळे, डॉ. मुनोत यांनी अण्णांच्या सर्व तपासण्या केल्या. काही दिवस अण्णांनी संपूर्ण विश्रांती घेण्याचा सल्ला डॉक्टरांनी दिलेला असल्याने किमान एक आठवडा कार्यकर्त्यांनी अण्णांना भेटण्याचा आग्रह धरू नये असे आवाहन कार्यालय व राळेगण सिद्धी परिवाराच्या वतीने करण्यात आले आहे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com