सुपा (वार्ताहर) -

ज्येष्ठ समाजसेवक पद्मभूषण अण्णासाहेब हजारे हे महाराष्ट्रातील सार्वजनिक ग्रंथालयांना स्वलिखित पुस्तकाच्या प्रती भेट

देणार आहेत. अण्णांनी लिहिलेल्या अनुभवाचे बोल व राळेगण सिद्धी एक अल्पसा परिचय ही दोन पुस्तके नुकतीच प्रकाशीत केली आहेत.

अण्णांनी आपल्या पेन्शनच्या जमा झालेल्या रक्कमेतून ही पुस्तके छापली आहेत. यात अण्णांनी एक पुस्तक देश सेवेसाठी, समाजासाठी केलेल्या आंदोलन व सामाजिक कार्यात आलेले अनुभव विशद केले आहेत. तर दुसर्या पुस्तकात अण्णांनी आपली कर्मभूमी व ग्रामविकासाची पंढरी म्हणून जगात नावलौकीक मिळविलेल्या राळेगण सिद्धीवर ‘राळेगण सिद्धी एक अल्प परिचय’ या पुस्तकात गेल्या 35-40 वर्षांत अण्णांनी आपल्या कार्य कुशलतेने राळेगणचा कायापालट मांडला आहे.

अण्णांनी या दोन्ही पुस्तकाच्या प्रती मोठ्या प्रमाणात तयार केल्या असून त्या सर्वसामान्य व महाराष्ट्रातील सर्व नागरिकांपर्यंत पोहचावे. या उद्देशाने ही पुस्तके राज्यातील सार्वजनिक ग्रंथालयांना विनामोबदला देण्याचा निर्णय घेतला. यासंदर्भात अण्णांनी आपले कार्यकर्ते व ग्रंथालय चळवळीचे कार्यकर्ते पत्रकार सुरेंद्र शिंदे यांच्याबरोबर पुस्तक वितरणाबाबत नियोजन केले.

राज्यातील साडेबारा हजार सार्वजनिक ग्रंथालयांना प्रत्येकी चार ते पाच प्रति याप्रमाणे प्रत्येक जिल्ह्याच्या जिल्हा ग्रंथालय अधिकार्यांमार्फत त्या त्या जिल्ह्यातील ग्रंथालयांना पोहच करण्याचे नियोजन ठरले. त्याप्रमाणे अण्णांनी मंगळवारी अहमदनगर जिल्ह्यातील 514 ग्रंथालयांसाठी दोन पुस्तकाच्या पाच-पाच हजार प्रती मंगळवारी पत्रकार शिंदे यांच्याकडे सुपूर्त केल्या.

यावेळी अण्णा हजारे यांचे माजी सहाय्यक दत्ता आवारी, राजाराम गाजरे, श्री. मापारी, माऊली कृपा गोशाळेचे संचालक नितीन महाराज शिंदे, मंगेश रसाळ, अमोल झेंडे अन्सार शेख उपस्थित होते.