अण्णा हजारेंच्या हत्येच्या धमकीचा व्हिडीओ व्हायरल

आरोपीवर पोलिसांची प्रतिबंधात्मक कारवाई
अण्णा हजारे
अण्णा हजारे

श्रीरामपूर |प्रतिनिधी| Shrirampur

कौटुंबिक शेतीच्या वादावरून काहींनी आपल्यावर आत्महत्या करण्याची वेळ आणली. खोटी अ‍ॅट्रोसिटी दाखल करण्याचा कट रचला, या प्रकाराची चौकशी करून दोषींवर कारवाई करावी, अन्यथा 1 मे 2023 रोजी आपण ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांची हत्या करू, अशी धमकी देणारा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या व्हिडीओमुळे एकच खळबळ उडाली आहे.

श्रीरामपूर तालुक्यातील निपाणी वडगाव येथील संतोष प्रभाकर गायधने या व्यक्तीच्या नावाने हा व्हिडीओ व्हायरल करण्यात आला आहे. जिल्हा पोलीस प्रमुख राकेश ओला यांना विनंती करणारा व्हिडीओ तयार करण्यात आला असून त्यात म्हटले आहे की, मी सर्वसामान्य शेतकरी असून माझ्या कौटुंबिक शेतीच्या वारस नोंदीची केस श्रीरामपूर तहसील कार्यालयात प्रलंबित आहे.

शेतीच्या वादाच्या कारणातून माझ्या गटातील लोकांनी एकत्र येऊन कुटुंबियांवर अन्याय करत आमच्यावर आत्महत्या करण्याची वेळ आणली आहे, तसेच एका महिलेच्या नावाने माझ्यावर खोटी अ‍ॅट्रोसिटी दाखल करण्याचा कट रचला होता. याबाबत आपण तत्कालिन राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्याकडे दाद मागितली होती.

याबाबत राज्यपालांनी अहमदनगर येथील जिल्हाधिकार्‍यांना आदेशही दिले होते. मात्र काहीच कार्यवाही झाली नाही. त्यामुळे मी व कुटुंबिय हतबल झालो आहे. या त्रासाला कंटाळून मला आत्महत्या करण्याची इच्छा होती मात्र आता आपण आत्महत्या करणार नाही आपल्यावरील अन्याय दूर करण्यासाठी यसर्व प्रकाराची चौकशी करून दोषींवर कारवाई करावी, अन्यथा आपण 1 मे 2023 रोजी राळेगणसिद्धी येथे जाऊन ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांची हत्या करू, असा धमकीचा इशारा या व्हिडीओच्या माध्यमातून देण्यात आला आहे. आता पोलीस याबाबत काय कारवाई करतात याकडे अनेकांचे लक्ष लागले आहे.

दरम्यान संतोष गायधने याच्यावर श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्यात भारतीय दंड विधान कलम 151 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याला ताब्यात घेण्यात आले आहे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com