आव्हाडांविरोधात अब्रुनुकसानीचा दावा ठोकणार - हजारे

आव्हाडांविरोधात अब्रुनुकसानीचा दावा ठोकणार - हजारे

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

ज्येष्ठ समाजसुधारक अण्णा हजारे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांच्याविरोधात आक्रमक झाले आहेत. त्यांचं आक्रमक होण्यामागील कारणही अगदी तसंच आहे. जितेंद्र आव्हाड यांनी काल सकाळी अण्णा हजारे यांचा फोटो ट्विट करत टीका केली. या माणसाने देशाचे वाटोळे केले. टोपी घातली म्हणजे कुणी गांधी होत नाही, असं खोचक ट्विट जितेंद्र आव्हाड यांनी केलं होतं. त्यांच्या या ट्विटला आता अण्णा हजारे यांनी प्रत्युत्तर देत जितेंद्र आव्हाड यांच्याविरोधात अब्रुनुकसानीचा दावा ठोकण्याचा इशारा दिला आहे. त्यामुळे आव्हाड अडचणीत येण्याची शक्यता आहे.

अण्णा हजारे आणि राष्ट्रवादी यांच्यातल्या भांडणाला इतिहास आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना 2011 मध्ये एका तरुणाने थप्पड मारली होती. त्यावेळी अण्णा हजारे यांना पत्रकारांनी तरुणाच्या या कृत्याबद्दल प्रश्न विचारला होता. त्यावर अण्णा हजारे यांनी एक ही थप्पड?, असा प्रतिसवाल करत या घटनेचं समर्थन केलं होतं. त्यामुळे राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांमध्ये अण्णा हजारे यांच्याबद्दल नाराजी निर्माण झाली होती. जितेंद्र आव्हाड यांनी काल ट्विटरवर अण्णा हजारेंवर टीका केली. त्यावर आता अण्णा यांनी उत्तर दिलंय.

माझ्यामुळे देशाचं वाटोळं झालं असं म्हणायचं तर मी जेवढे काही कायदे केले त्या कायद्यांचा जनतेला फायदा झाला. माहितीचा अधिकार या देशाला मिळाला. एक झालं, माझ्या काही आंदोलनांमुळे यांच्या कार्यकर्त्याचं वाटोळं झालं हे नाकारता येत नाही. बरेच कार्यकर्ते घरी गेले ना, हे त्यांचं नुकसान झालं. ते त्यांना कदाचित सहन होत नसेल. म्हणून काहीतरी कुरापत काढायची, बदनामी करायची. पण काही फरक पडत नाही, अशी प्रतिक्रिया अण्णा हजारे यांनी दिली.

अण्णा हजारे यांनी यावेळी जितेंद्र आव्हाड यांच्याविरोधात अब्रुनुकसानीचा दावा ठोकणार असल्याची माहिती दिली. आम्ही वकिलाचा सल्ला घेऊ. हे ज्याने म्हटलं, वाटोळं केलं, त्याच्यावर अब्रुनुकसान भरपाईचा दावा लावता येईल का, कुठे-कुठे लावता येईल, कसा लावता येईल याची चौकशी करुन, योग्य तो निर्णय घेऊ, असा इशारा अण्णा हजारे यांनी दिला.

   
logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com