हजारे यांनी दारूऐवजी जीएसटी धोरणाबाबत आवाज उठवावा - थोरात

हजारे यांनी दारूऐवजी जीएसटी धोरणाबाबत आवाज उठवावा - थोरात

देवळाली प्रवरा |वार्ताहर|Devalali Pravara

ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी नुकतेच दिल्लीचे मुख्यमंत्री केजरीवाल यांना दारुच्या धोरणाबाबत पत्र पाठवून निषेध व्यक्त केला. वास्तविक पाहता देशात सध्या प्रचंड महागाई वाढली आहे. पेट्रोल, डिझेल, गॅस, खाद्यतेल यांच्यासह जिवनावश्यक वस्तूंचे दर गगनाला भिडले आहेत. महागाईचे प्रचंड चटक्यामध्ये सर्वसामान्य जनता होरपळून निघत असतांना हजारे या बाबतीत काहीच बोलत नाहीत. दारु धोरणाऐवजी हजारे यांनी जिवनावश्यक वस्तूंवर केंद्र सरकारने लावलेल्या जीएसटी धोरणाबाबत आवाज उठवावा. या प्रश्नाबाबत आम्ही सदैव त्यांच्यासोबत राहू, असे प्रतिपादन रिपाइं जिल्हाध्यक्ष सुरेंद्र थोरात यांनी केले.

थोरात म्हणाले, देशातील अनेक उद्योगपती हजारो कोटींचे कर्ज बुडवून देश सोडून पसार आहेत. देशाचा विकासाचा दर किती टक्क्यांनी घसरला? याबाबतीतही हजारे काहीच बोलत नाहीत. दिल्लीतच नव्हे तर संपूर्ण देशात दारु विकली जाते. हजारे ज्या महाराष्ट्रात राहतात, त्या ठिकाणी दारुबाबत काय परिस्थिती आहे? हे हजारेंना माहिती आहे. याबाबत महाराष्ट्रातील मुख्यमंत्र्यांना ते का पत्र पाठवू शकत नाही? दिल्लीमध्ये कित्येक महिने शेतकर्‍यांचे आंदोलन सुरु होते. पाऊस, ऊन, थंडी याची तमा न बाळगता शेतकरी बसून होते. तरीसुद्धा हजारेंनी एकवेळ सुद्धा या शेतकर्‍यांना भेट दिली नाही. किंबहूना पंतप्रधान मोदी यांना पत्र सुद्धा पाठविले नाही.

महाराष्ट्रात नरेंद्र दाभोळकर, गोविंद पानसरे, पत्रकार गौरी लंकेश, डॉ.कलबुर्गी यांच्यासारख्या समाजसेवक, साहित्यिकांची हत्या करण्यात आली. आजही त्यांच्या मारेकर्‍यांना शिक्षा नाही, ही फार मोठी शोकांतिका आहे. यावर सुद्धा हजारेंनी कधी आवाज उठविला नाही. ज्या संविधानाचे नाव घेऊन हजारेंनी आत्तापर्यंत आंदोलन, उपोषणे केली, ते संविधान दिल्लीच्या संसद भवनासमोर जाळण्यात आले. तरीही हजारे याबाबतीत बोलले नाही. हजारेंनी पत्र लिहिण्यापूर्वी या सर्व गोष्टींचा विचार करायला पाहिजे होता. असे थोरात यांनी सांगितले.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com