माजी सैनिकांनी ठरवले तर देश बदलण्यास वेळ लागणार नाही

ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांचे आवाहन
माजी सैनिकांनी ठरवले तर देश बदलण्यास वेळ लागणार नाही

पारनेर |तालुका प्रतिनिधी| Parner

देशात दरवर्षी 70 ते 80 हजार सैनिक निवृत्त होतात. तसेच महाराष्ट्रातून दरवर्षी 7 हजार सैनिक निवृत्त होतात. या सैनिकांनी ठरवले तर हा देश बदलायला वेळ लागणार नाही. माजी सैनिकांनी सैन्यात असताना देशासाठी योगदान दिले तसेच निवृत्तीनंतर समाजासाठी योगदान द्यावे, असे आवाहन ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी केले.

राळेगणसिद्धी येथे पारनेर तालुक्यातील माजी सैनिकांचे एक दिवशीय शिबिर आयोजित करण्यात आले होते. त्यावेळी मार्गदर्शन करताना हजारे बोलत होते. या शिबिरासाठी पारनेर तालुक्यातील 70 गावांमधून प्रातिनिधिक स्वरुपात 75 माजी सैनिक उपस्थित होते. भ्रष्टाचार विरोधी जन आंदोलन न्यास आणि पारनेर तालुका माजी सैनिक मंच यांच्या संयुक्त विद्यमाने शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.

अण्णा हजारे म्हणाले, मजबूत संघटनेशिवाय कोणतेही प्रश्न सुटणार नाहीत. संघटन केवळ संख्यात्मक नको तर गुणात्मक असायला हवे. चारित्र्यशील लोकांचे संघटन झाले तर सरकारचे नाक दाबल्यास तोंड उघडायला वेळ लागणार नाही. तसेच समाजासाठी जगण्याची आणि समाजासाठीच मरण्याची तयारी अशा नेतृत्वाने ठेवायला हवी. हे काम एक माजी सैनिक नक्कीच करू शकतो, असा विश्वास हजारे यांनी व्यक्त केला.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक बाळासाहेब नरसाळे यांनी केले. प्रकाश ठोकळ, महादेव लामखडे, राहूल गाडगे यांनी आपले मनोगत व्यक्त केले तर मारुती पोटघन, राज्य सैनिक संघटनेचे नारायण अंकुशे व कॅप्टन विठ्ठल वराळ यांनीही यावेळी सैनिकांना मार्गदर्शन केले. रावसाहेब चक्रे यांनी सूत्रसंचालन केले तर साठे यांनी आभार मानले. शिबिर यशस्वी होण्यासाठी संदीप पठारे, श्यामकुमार पठाडे, अन्सार शेख, रामदास सातकर यांनी सहकार्य केले.

जनआंदोलनात देणार योगदान

यावेळी आलेल्या सर्व माजी सैनिकांनी आपापल्या गावासाठी योगदान देण्याचा आणि अण्णा हजारे यांच्या भ्रष्टाचार विरोधी जन आंदोलनात सहभागी हेण्याचा निर्णय घेतल्याचे जाहीर करण्यात आले.

Related Stories

No stories found.