सरकार पाडू शकेल इतकी मोठी जनसंसद बनवा

सरकार पाडू शकेल इतकी मोठी जनसंसद बनवा

राष्ट्रीय कार्यकर्ता शिबिरात अण्णा हजारे यांचे आवाहन

पारनेर |तालुका प्रतिनिधी| Parner

कोणत्याच राजकीय पक्षाकडून देशाला उज्ज्वल भविष्य नाही. सर्वच राजकीय पक्ष पैशातून सत्ता आणि सत्तेतून पैसा या तत्त्वावर चालले आहेत. कोणतेच सरकार स्वातंत्र्याचा अर्थ समजू शकले नाही.त्यासाठी जनसंसद इतकी मोठी बनवा की, तिने सरकार पाडले पाहिजे. देश वाचविण्यासाठी आता दुसरा रस्ता राहिला नाही, असे आवाहन ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी राळेगण सिद्धी येथे केले.

रविवारी राळेगण सिद्धी येथे राष्ट्रीय कार्यकर्ता शिबिर पार पडले. या शिबिरात 14 राज्यातील 86 प्रतिनिधी उपस्थित होते. दिवसभर चाललेल्या या शिबिरात राष्ट्रीय संघटन करण्याचा निर्णय घेण्यात आला. यावेळी मंचावर अण्णांसह जगदिश प्रसाद सोलंकी (दिल्ली), रामपाल जाट (राजस्थान), भोपालसिंह चौधरी (उत्तराखंड), कल्पना इनामदार (मुंबई), योगेद्र पारिख (राजस्थान), अशोक सब्बन (महाराष्ट्र), दशरथ भाई (राजस्थान) आदी उपस्थित होते.

शिबिराला संबोधीत करताना अण्णा म्हणाले, काँग्रेस असो अथवा भाजपा किंवा इतर कोणत्याच पक्षाकडून देशाला उज्ज्वल भविष्य नाही. देशाला बदलायचे असेल तर सरकार कोणत्याही पक्षाचे असो त्यांच्यावर दबावासाठी जनसंसद हे एक माध्यम आहे. यासाठी बिगर राजकीय दबाव ग्रुप झाला पाहिजे. यावेळी अण्णांनी देशातील सद्य स्थितीवर प्रकाश टाकला. 70 वर्षांनंतरही देशाची हालत योग्य नाही.

स्वातंत्र्यापूर्वी बाहेरच्यांनी देशाला लुटले आता देशातील लुटत आहेत. यावेळी अण्णांनी शेतकर्‍यांच्या अडचणींवरही जोर देत भाष्य केले. यासाठी मी दोन-तीन वेळा आंदोलन केले असून यावेळी दिलेले आश्वासन पाळले जात नाही. शेतकर्‍यांच्या मालाला हमी भावासह सी. 2+50 प्रमाणे एमएसपी लागू करा, या मागण्या मी वेळोवेळी केल्या आहेत, असेही अण्णांनी आवर्जुन सांगितले.

शिबिरात जनहिताच्या अनेक मुद्यांवर चर्चा झाली. यात राष्ट्रीय संघटन बनविण्याची जबाबदारी काही प्रमुख नेत्यांवर सोपविण्यात आली. यावेळी विकल पचार (हरियाना), विष्णू प्रसाद बराल (आसाम), दयानंद पाटील (कर्नाटक), प्रविण भारतीय (उत्तर प्रदेश), अशोक मलिक( हरियाना) यांच्यासह प्रमुख कार्यकर्ते उपस्थित होते.

राजकीय महत्त्वाकांक्षेने नुकसान

सन 2011 च्या लोकपाल आंदोलनात बिगर राजकीय दबाव निर्माण करणारी अशीच टीम बनवली होती. परंतु त्यानंतर काही लोकांनी राजकीय महत्वाकांक्षेपोटी राजकारणात प्रवेश करून कोणी मुख्यमंत्री तर कोणी राज्यपाल झाले. तर कोणी मंत्री झाले यात देशाचे मोठे नुकसान झाले.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com