सुपा |वार्ताहर| Supa

शेतकर्यांच्या मागण्यांसंबंधी सरकारने पूर्वी दिलेल्या आश्वसनांची आठवण करून देण्यासाठी कृषिमंत्र्यांना पाच पत्र लिहिली, त्यांचे उत्तर आले नाही.

उपोषणाचा इशारा देणारे पत्र लिहिले, त्याचेही उत्तर नाही. उपोषणासाठी जागा मिळावी म्हणून पत्रं लिहिली, त्याचेही उत्तर नाही. त्यामुळे संशय येतोय की सरकार माझ्यावर सूड उगवतेय काय, असे खरमरीत पत्र ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना लिहिले आहे. सत्तेवर येण्यापूर्वी हजारेंचे कौतुक करणारे आपण व आपले सहकारी आता खूपच बदलले असून जुन्या भाषणांची आठवण करून देण्यासाठी त्यांचे व्हिडिओ पाठवून देतो, असेही हजारे यांनी पत्रात म्हटले आहे.

शेतकर्यांच्या प्रश्नांवर दिल्लीत जानेवारीच्या शेवटच्या आठवड्यात आंदोलन करण्याचा इशारा हजारे यांनी दिला आहे. राज्यातील भाजपचे नेते दोनदा भेटून गेले असले तरी केंद्र सरकारकडून मात्र त्यांना काहीही प्रतिसाद मिळेला नाही. त्यामुळे संतापलेल्या हजारे यांनी थेट मोदींनाच खरमरीत भाषेत पत्र लिहिले आहे.

या पत्रात हजारे यांनी म्हटले आहे, शेतकर्यांच्या मागण्यांसंबंधी आपण पूर्वी आंदोलन केले, तेव्हा आपल्या सरकारने दोन वेळा लेखी आश्वासने दिली होती. मात्र, त्यावर पुढे काहीच झाले नाही. त्यामुळे आपण पाच वेळा स्मरणपत्र लिहिली. त्याचे उत्तर आले नाही. आता जानेवारीच्या शेवटच्या आठवड्यात दिल्लीत उपोषण करण्याचे ठरविले आहे. त्यासाठी रामलीला मैदान मिळावे म्हणून संबंधित खात्याला चार पत्र लिहिली.

पण त्यांचेही उत्तर आले नाही. केंद्रीय कृषिमंत्रीही पत्राला उत्तर देत नाहीत, ही गोष्ट आपल्या सरकारला शोभत नाही. यातून आपण माझ्याशी सूडबुद्धीने वागत आहात, असा संशय निर्माण होत आहे. वास्तविक पहता शांततेच्या मार्गाने आंदोलन करण्याचा अधिकार व्यक्ती किंवा समुहाला आहे.याचीही जाणीव हजारे यांनी करून दिली आहे.

याच पत्रात हजारे यांनी मोदी यांना पूर्वीच्या त्यांच्या भूमिकेची आठवण करून दिली आहे. त्यांनी म्हटले आहे, 2011 मध्ये रामलीला मैदानावर 13 दिवसांचे आंदोलन झाले. त्यावेळच्या केंद्र सरकारने दोन वेळा संसदेचे विशेष अधिवेशन बोलाविले होते. त्या आधिवेशनात 26 ऑगस्ट 2011 व 17 ऑगस्ट 2013 रोजी आपण आणि आपल्या वरिष्ठ सहकार्यांनी अण्णा हजारे यांची खूप स्तुती केली होती.

आता मात्र, तीन वर्षांनंतर शेतकर्यांच्या प्रश्नांवर आम्हाला लेखी आश्वासन दिलेले असूनही तुमचेच सरकार त्याचे पालन करीत नाही. एवढेच काय तर साधे पत्राला उत्तरही देत नाहीत. त्यावेळी आपण आणि आपल्या सहकार्यानी केलेल्या भाषणांचे व्हिडिओ आहेत, आठवण करून देण्यासाठी आपल्याला ते पाठवून देतो. एका फकिराचे जीवन जगत असताना देशाला माहितीचा अधिकार, लोकपाल आणि अन्य दहा कायदे मिळून देऊ शकलो, हेच जीवनाचे सार्थक आहे,फअसे सांगत आपल्या आयुष्यातील शेवटच्या आंदोलनावर ठाम असल्याचे हजारे यांनी म्हटले आहे.