अंकुश चत्तर खून प्रकरण : तोफखाना पोलिसांकडून आणखी दोघांना अटक

24 जुलैपर्यंत पोलीस कोठडी
अंकुश चत्तर खून प्रकरण : तोफखाना पोलिसांकडून आणखी दोघांना अटक

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

अंकुश चत्तर खून प्रकरणी तोफखाना पोलिसांनी आणखी दोघांना बुधवारी अटक केली आहे. अरूण अशोक पवार (वय 23 रा. नगर) व राजू भास्कर फुलारी (वय 31 रा. शेंडी बायपास ता. नगर) अशी त्यांची नावे आहेत. न्यायालयाने या दोघांनाही 24 जूनपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.

15 जुलै रोजी रात्री अंकुश चत्तर यांच्यावर सावेडीतील एकविरा चौकात प्राणघातक हल्ला झाला होता. उपचारादरम्यान त्यांचे निधन झाले. याप्रकरणी पोलिसांनी सराईत गुन्हेगार भाजपाचा नगरसेवक स्वप्निल रोहिदास शिंदे, अक्षय प्रल्हादराव हाके, अभिजीत रमेश बुलाख, महेश नारायण कुर्‍हे, सुरज ऊर्फ विकी राजन कांबळे, मिथुन सुनील धोत्रे यांना अटक केली होती. ते सध्या पोलीस कोठडीत आहेत. तिघा अल्पवयीन मुलांना ताब्यात घेण्यात आले असून त्यांची रवानगी बालसुधारगृहात करण्यात आली आहे. राजू फुलारी व अरूण पवार हे पसार होते. पोलिसांकडून त्यांचा शोध सुरू होता.

तोफखाना पोलीस ठाण्याचे निरीक्षक मधुकर साळवे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक निरीक्षक नितीन रणदिवे, जुबेरअहमद मुजावर, उपनिरीक्षक समाधान सोळंके, अंमलदार दत्तात्रय जपे, संदीप धामणे, सुनील शिरसाठ, वसीम पठाण, शिरीष तरटे, अतुल कोतकर, सचिन जगताप, सतीश त्रिभुवन, सतीश भवर, गौतम सातपुते, संदीप गिरे, सावळेराम क्षीरसागर, सूरज वाबळे, धीरज खंडागळे यांच्या पथकाने दक्षिण मोबाईल सेलचे नितीन शिंदे व राहुल गुंडू यांच्या मदतीने तांत्रिक तपास करत दोघांचा शोध घेतला.

राजू फुलारी हा मानोरी (ता. राहुरी) येथे असल्याची माहिती मिळताच पथकाने पहाटेच्या सुमारास त्याला ताब्यात घेतले. तर अरुण पवार हा बोल्हेगाव परिसरात येणार असल्याची माहिती मिळताच पथकाने सापळा रचून मोरया पार्क (बोल्हेगाव) येथून त्याला ताब्यात घेतले. या दोघांनाही दुपारी न्यायालयासमोर हजर करण्यात आले होते. गुन्ह्यात वापरलेली हत्यारे, कपडे, गाडी हस्तगत करायची आहे, घटनेचे कारण व उद्देशाचा तपास करायचा आहे. त्यामुळे दोघांना पोलीस कोठडी देण्याची मागणी तपासी अधिकार्‍यांनी केली. न्यायालयाने दोघांनाही 24 जूनपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.

   
logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com