श्रीरामपूर |प्रतिनिधी|Shrirampur

श्रीरामपूर शहराची वाढती लोकसंख्या आणि विस्तार पाहता रेल्वे रुळाच्या पलिकडील भागात हिंदू स्मशानभूमी आणि मुस्लिम कब्रस्तानची गरज असून

मिल्लतनगरजवळ याबाबत विकास योजनेत आरक्षण मंजूर आहे. सदर हिंदू स्मशानभूमी आणि मुस्लिम कब्रस्तानच्या जागा संपादनाची प्रक्रिया श्रीरामपूर नगरपालिकेने तातडीने सुरू करावी, अशी मागणी ज्येष्ठ नगरसेवक अंजुम शेख यांनी नगराध्यक्षा अनुराधा आदिक यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.

अंजुम शेख यांनी नगराध्यक्षा आदिकांना हे निवेदन दिले. त्याप्रसंगी नगरसेवक ताराचंद रणदिवे, राजेंद्र पवार, रज्जाकभाई पठाण, अस्लमभाई सय्यद, एस. के. खान आदी उपस्थित होते.

श्रीरामपूर शहरातील रेल्वेलाईनच्या उत्तरेकडील भागामध्ये मोठ्या प्रमाणावर नागरी वसाहती झालेल्या आहेत. नागरिकांच्यादृष्टीने मुलभूत सुविधा या वसाहतींच्या जवळच्या क्षेत्रामध्ये उपलब्ध व्हाव्यात म्हणून नगरपरिषदेने विकास योजना मंजूर केलेल्या असून विषयांकीत आरक्षणे ठेवलेली आहेत. सदर स्मशानभूमीसाठी आरक्षण क्र. 40 हे 0.72 हेक्टरवर तर मुस्लिम कब्रस्तानसाठी आरक्षण क्र. 41 हे 0.68 हेक्टरवर असून त्याचा सिटी सर्व्हे नंबर 2176 आहे. सदर क्षेत्र हे मिल्लतनगर येथील साठवण तलावाच्या शेजारी आहे.

कॉलेज रोडला जी मुस्लिम समाजासाठी दफनभूमी आहे. वाढती लोकसंख्या पाहता नवीन दफनभूमीची निश्चित गरज आहे. त्याचप्रमाणे हिंदू स्मशानभूमीचे शहरातील अंतर पाहता याच भागात नवीन स्मशानभूमीची गरज आहे. शिवाय या दोन्हीही विषयांसाठी जागेचे आरक्षण मंजूर असल्याने तातडीने पालिकेने जर या दोन्ही कामांसाठी जागा संपादनाची प्रक्रिया सुरू केल्यास नागरिकांच्यादृष्टीने हे मोठे काम होणार आहे.

कारण भविष्यात जर जागांचे भाव वाढले तर जागेच्याही किंमती वाढतील आणि नगरपालिकेला या जागा अधिग्रहीत करणे कदाचित खर्चिकही होईल. त्यापेक्षा तातडीने सदर दोन्ही कामांसाठी पालिकेने अधिग्रहणाची प्रक्रिया सुरू केल्यास आणि सर्वसाधारण सभेत यावर निर्णय घेतल्यास पुढील दोन-पाच वर्षात संपूर्ण प्रक्रिया पूर्ण होऊन नागरिकांसाठी ही गरजेची सुविधा होईल म्हणून आपण लवकरात लवकर कारवाई करावी, अशी मागणी या पत्रकात अंजुम शेख यांनी केली आहे. याबाबत नगराध्यक्षा अनुराधा आदिक यांच्याशी चर्चा झाली असून त्यांनीही याबाबत सकारात्मक प्रतिसाद दिल्याचे अंजुम शेख यांनी सांगितले.