रांजणगाव देशमुख |वार्ताहर|Ranjangav Deshmukh
अंजनापूर मधील युवकांनी व ग्रामस्थांनी एकत्र येत दरवर्षी वृक्ष लागवडीची परंपरा सुरू केली ती प्रेरणादायी आहे. या कामासाठी शासकीय व्यवस्थेनेही पुढे येणे गरजेचे आहे. वृक्षवेध फाउंडेशनने लावलेली झाडे पाहून आनंद होतो हे कार्य कल्पनेच्या पलीकडे आहे, असे प्रतिपादन आदर्शगाव पाटोद्याचे राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त सरपंच भास्करराव पेरे पाटील यांनी केले.
कोपरगाव तालुक्यातील अंजनापूर येथे वृक्षवेध फाउंडेशनच्या वतीने 551 आशीर्वाद वृक्षरोपन आणि संवर्धन शपथ कार्यक्रम ग्रामपंचायतीच्या प्रांगणात आयोजित करण्यात आला होता. यावेळी वृक्षसेवकाशी संवाद साधतांना ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी बापूसाहेब गव्हाणे होते. आठ वर्षात एकूण लागवड केलेल्या झाडांची संख्या 9 हजार 241 झाली आहे. यावेळी गटविकास अधिकारी सचिन सूर्यवंशी, प्रभारी कृषी अधिकारी मनोज सोनवणे, वन अधिकारी निलेश रोडे, सहाय्यक गटविकास अधिकारी साबळे, भरत भाई, जयंत गडाख, सरपंच कविता गव्हाणे, उद्योजक बाबासाहेब गव्हाणे, वनपाल ताजणे आदी उपस्थित होते.
यावेळी श्री. पेरे पाटील म्हणाले, शासकीय योजनेच्या माध्यमातून झाडे लावा. झाड पावसाचं एटीएम आहे. कष्टाशिवाय पर्याय नाही. कष्ट करायला शिका. ऑक्सिजन सर्वांना लागतो मात्र झाडे लावत नाही. देशाला वृक्षचळवळीची गरज आहे. आपलं काम मन लावून करा यश मिळतेच. जिवनात पैसा हे अंतिम ध्येय नाही. दुसर्यांला आनंद देण्यातच खरी मजा आहे. देशासाठी गावासाठी काम करा. ज्ञान व विज्ञानाची सांगड घालुन काम करा. माणसाचे मन चांगले नसेल तर चांगल्या गोष्टी सुचणार नाही. माणसे समजून घ्यावी लागतात. माणसे समजली की माणूस यशस्वी होतो.
गटविकास अधिकारी सचिन सुर्यवंशी म्हणाले, अंजनापूरमध्ये वृक्षवेध फाऊंडेशनचे काम हे कुठल्याही शब्दांच्या पलिकडचे व अतिशय कौतुकास्पद आहे. अंजनापूर येथे जुलै 2015 पासुन वृक्षवेध फाउंडेशन व ग्रामस्थ यांच्या मदतीने 45 झाडांची लागवड करुन वृक्षचळवळीस सुरवात केली. आठ वर्षापासून मोठ्या प्रमाणात वृक्षारोपण करण्यात येते. यावर्षी 551 वृक्षांचे रोपण करण्यात आले असून त्यांना सुरक्षा जाळीही लावण्यात आली आहे.
आठ वर्षात एकूण लागवड केलेल्या झाडांची संख्या 9241 झाली आहे. विशेष म्हणजे ही सर्व झाडे शंभर टक्के जोपासली गेली आहे. मोठ्या प्रमाणात होणार्या वृक्षलागवडीमुळे गावाचे रुपच बदलून गेले आहे. ही झाडे आज गावात येणारे जाणारांचे स्वागत करत आहे. दरवर्षी 6 जुलै ते 9 जुलै या कालावधीत वृक्षलागवड करण्यात येते. व्हाट्सअॅप ग्रुपच्या माध्यामातून झाडांना निधी गोळा करण्यापासून ते पाणी टाकण्यापर्यंतचे सर्व नियोजन केले जाते.