कोपरगाव शहर व सुभद्रानगर परिसरात पोलिसांनी गस्त वाढवावी - अंजली काळे

कोपरगाव शहर व सुभद्रानगर परिसरात पोलिसांनी गस्त वाढवावी - अंजली काळे

कोपरगाव |तालुका प्रतिनिधी| Kopargav

शहरात भुरट्या चोर्‍यांचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढले असून दिवाळी सणामुळे सर्वत्र गर्दी वाढत आहे.

सुभद्रानगर परिसरात दिवसाढवळ्या महिलांच्या अंगावरील दागिने ओरबाडले जाण्याच्या घटना घडत असून शहर पोलिसांनी गस्त वाढवावी, अशी मागणी सामाजिक कार्यकर्त्या अंजली काळे यांनी केली आहे.

शहरातील सुभद्रानगर परिसरात दोन महिन्यांपूर्वी घराच्या खिडकीतून चोरट्यांनी डल्ला मारला असून त्या चोरीचा आजवर तपास लागलेला नाही. अशातच दुचाकी चोरीला जाण्याच्या घटनांची भर पडली आहे. सध्या दिवाळी सणाची धामधूम सुरू असून महिला भगिनी मोठ्याप्रमाणावर बाहेरगावी जात आहेत.

सण असल्यामुळे महिला भगिनी सोन्याचे अलंकार परिधान करीत आहेत. बाजारपेठेत व रस्त्यावर होणार्‍या गर्दीचा फायदा घेऊन महिलांच्या अंगावरील दागिने ओरबाडले जात आहेत. सोमवारी भाऊबीजेच्या दिवशी एका महिलेच्या अंगावरील 5 तोळ्याचे गंठण दुचाकीवर आलेल्या भुरट्या चोरांनी लंपास केले आहे. यामध्ये या महिलेला दुखापत देखील झाली.

काही दिवसांपासून होत असलेल्या चोर्‍यांचा पोलीस प्रशासन तपास न लावू शकल्यामुळे अशा भुरट्या चोरांचे मनोधैर्य वाढले असून महिलांच्या अंगावरील दागिने लुटले जात असल्याच्या प्रकारामुळे महिला भगिनींमध्ये घबराटीचे वातावरण पसरले आहे.

याची पोलीस प्रशासनाने दखल घेऊन अशा घटना यापुढे घडू नये यासाठी कोपरगाव शहर व सुभद्रानगर परिसरात पोलिसांनी गस्त वाढवून भुरट्या चोरांचा बंदोबस्त करावा, अशी मागणी अंजली काळे यांनी केली आहे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com