
अहमदनगर | Ahmednagar
केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी बुधवारी (१ फेब्रुवारी) २०२३-२४ साठी केंद्रीय अर्थसंकल्प सादर केला. यावेळी निर्मला सीतारमण यांनी अनेक महत्त्वाच्या घोषणा केल्या. यावर स्वतंत्र भारत पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष अनिल घनवट यांनी प्रतिक्रिया दिली आहे. हा अर्थसंकल्प शेतकऱ्यांसाठी न साकार होणारे स्वप्न दाखवल्या सारखे आहे, अशी प्रतिक्रिया अनिल घनवट यांनी दिली आहे.
शेतीत आधुनिक तंत्रज्ञान व संशोधनाला प्रोत्साहन देण्यासाठी तरतूद केली आहे मात्र जी एम सारख्या आधुनिक तंत्रज्ञानाला बंदी घातली आहे. व त्यावरील संशोधन व चाचण्यांना ही बंदी आहे. आत्मनिर्भर होण्याच्या गोष्टी करतात अन पारंपरिक शेतीकडे वाटचाल सुरू आहे. कापूस उत्पादकांच्या भल्यासाठी भरीव काम करणार म्हणतात, डिजिटल प्लॅटफॉर्म उपलब्ध करून देणार म्हणतात पण कापसाच्या व इतर शेतीमालाच्या वायद्यांवर बंदी घालतात.
ग्रीन ग्रोथच्या कार्यक्रमात इथेनॉल, बायोडीझेलला प्रोत्साहन पण तेल कंपन्या त्या प्रमाणात इथेनॉलचे ब्लेंडिंग करत नाहीत. जगातली पाचवी अर्थव्यस्था पण जवळपास साठ टक्के जनतेला मोफत अन्न पुरवण्याची वेळ आली आहे. शेतीसाठी २० लाख कोटी अर्थसहाय्याची तरतूद केली पण बहुतेक शेतकरी थकबाकीत असल्यामुळे शेतकऱ्यांना याचा कितपत लाभ घेण्यात येईल सांगता येत नाही, असे त्यांनी सांगितले.