
अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar
राज्य अंगणवाडी कृती समितीच्या वतीने अंगणवाडी सेविकांनी विविध मागण्यांसाठी नगरसह राज्यभरात सोमवारपासून बेमुदत संप पुकारला आहे. शनिवारी संपाच्या सहाव्या दिवसांपर्यंत काहीही तोडगा निघाला नसल्याने हा संप सुरूच आहे. दरम्यान, जिल्ह्यातील साडेनऊ हजार अंगणवाडीसेविका, मदतनीस या संपात सहभागी असल्याने गेल्या पाच दिवसांपासून जिल्ह्यातील लाखो बालके पोषण आहारापासून वंचित आहेत.
नगरसह राज्यातील अन्य जिल्ह्यात संपामुळे सर्वच अंगणवाड्या बंद आहेत. अंगणवाडी बंद असल्याने सहा वर्षापर्यंतची बालके पोषण आहारापासून वंचित आहेत. वेतनश्रेणी लागू करणे किंवा मानधनात वाढ करणे, पेन्शन लागू करणे आदी प्रमुख मागण्यांसाठी 20 फेब्रुवारीपासून महाराष्ट्रात अंगणवाडी कर्मचारी संघटनांच्या कृती समितीने अंगणवाडी सेविका-मदतनीस यांचा बेमुदत राज्यव्यापी संप पुकारला आहे.
दरम्यान, या काळात राज्यातील अंगणवाड्या बंद करून सर्व अंगणवाडी सेविका व मदतनीस संपात सहभागी झाल्या आहेत. जिल्ह्यात 5 हजार 634 लहान-मोठ्या अंगणवाड्या आहेत. यात 4 हजार 595 अंगणवाडीसेविका, 816 मिनीसेविका, तर 4 हजार 142 मदतनीस असे एकूण साडेनऊ हजार कर्मचारी कार्यरत आहेत.
हे सर्वजण बेमुदत संपात सहभागी असल्याने अंगणवाड्यांना सोमवारपासून कुलूप आहे. तालुका, जिल्हा, तसेच राज्य पातळीवर अंगणवाडी सेविकांकडून दररोज निदर्शने, मोर्चे सुरू आहेत. परंतु अद्याप शासनाने यावर तोडगा काढलेला नाही. यापूर्वी 2014 मध्ये 45 दिवस व 2017 मध्ये 40 दिवस अंगणवाडीसेविकांचे आंदोलन सुरू होते. त्यामुळे आता आणखी किती दिवस हे आंदोलन सुरू राहणार, याकडे लक्ष लागले आहे.
जिल्हा परिषद महिला बालकल्याण विभाग दररोज संपात सहभागी असणार्या अंगणवाडी सेविका आणि मदतनिस यांची माहिती संकलित करून राज्य सरकारच्या महिला बालकल्याण विभागाला कळवत आहे. रविवारी संपावर तोडगा निघण्याची शक्यता कमी असून सोमवारी सरकार संपात हस्तक्षेप करणार की नाही, याकडे लक्ष आहे.