
अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar
वारंवार मागणी करूनही मानधनात वाढ नसणे, अंगणवाड्यांचे भाडे, आहाराच्या दरात वाढ नाही, सेवासमाप्ती लाभ, आजारपणाच्या रजा नाहीत, हक्काच्या उन्हाळी सुट्ट्या बंद, नवीन मोबाइलसाठी निधी नाही, सदोष ट्रॅकर अशा मागण्यांबाबत शासनाकडे वेळोवेळी मागण्या करूनही दखल न घेतल्याने राज्यातील सर्व अंगणवाडी सेविकांनी 20 फेब्रुवारीपासून कामबंद आंदोलन सुरू केले आहे.
दरम्यान, जिल्हा परिषद महिला बालकल्याण विभागाने घेतलेल्या माहितीनुसार पहिल्या दिवशी जिल्ह्यातील अंगणवाडी सेविका, मिनी अंगणवाडी सेविका आणि मदतनिस या शंभर टक्के आंदोलनात सहभागी असल्याचे समोर आले. जिल्ह्यातील साडेपाच हजार अंगणवाड्यांचे काम ठप्प झाले आहे.
यापूर्वीही अंगणवाडी सेविकांनी अनेकदा मागण्यांबाबत शासनाकडे अनेकदा पाठपुरावा केला आहे. परंतु सरकारकडून फक्त आश्वासने देण्यात आली. राज्य सरकारकडून मानधनामध्ये साडेपाच वर्षांपूर्वी, तर केंद्र सरकारकडून साडेचार वर्षांपूर्वी मानधनामध्ये वाढ करण्यात आली. त्यानंतर अंगणवाडी सेविकांच्या मानधनात कोणतीही वाढ करण्यात आली नाही. हिवाळी अधिवेशनासह गेल्या तीन महिन्यांपासून मागण्यांबाबत राज्य शासनाकडे पाठपुरावा करण्यात आला.
मात्र त्याची काहीही दखल घेतलेली नाही, त्यामुळे आता बेमुदत कामबंदचा निर्णय घेतल्याचे संघटनांचे म्हणणे आहे. 20 फेब्रुवारीपासून अंगणवाड्यांचे कामकाज बंद ठेवण्यात येईल. या काळात पोषण ट्रॅकर भरणार नाही, अहवाल आणि माहिती देणार नाही, तसेच अंगणवाड्यांना कुलूप लावूून मागण्यांसाठी रस्त्यावर उतरण्याचा निर्णय अंगणवाडीसेविकांनी केला आहे. अंगणवाडीसेविकांनी बेमुदत संप पुकारताना राज्य सरकार आणि प्रशासनाला 1 फेब्रुवारीला नोटीस दिली होती.
परंतु मागण्यांबाबत विचार न झाल्याने हे आंदोलन सुरू झाले आहे. येत्या 28 फेब्रुवारीपासून मुंबईतील आझाद मैदानावर राज्यातील सर्व अंगणवाडीसेविका आंदोलनास बसणार आहेत. आमची तर किमान वेतनाचीच मागणी आहे, परंतु वाढती महागाई लक्षात घेता किमान अडीच हजार रुपये मानधनात वाढ करावी, अशी माहिती जिल्हा अंगणवाडीसेविका, मदतनीस कर्मचारी युनियनचे सरचिटणीस जीवन सुरडे, जिल्हाध्यक्षा मदिना शेख यांनी दिली.
गेल्या तीन महिन्यांपासून वेळोवेळी शासनाला मागण्यांबाबत कळवले आहे. यामुळे हे बेमुदत कामबंद आंदोलन अचानक नाही. शासनाकडून आमची दखल घेतली गेली नाही. आता या आंदोलन टप्प्यात प्रत्येक आमदाराला, तसेच जिल्हा प्रशासनाला निवेदन देण्यात येईल. तसेच 28 फेब्रुवारीपासून मुंबईत आंदोलन सुरू करण्यात येणार आहे.
- जीवन सुरडे, सहचिटणीस, जिल्हा अंगणवाडी कर्मचारी युनियन
हे बेमुदत कामबंद आंदोलन आहे. 2014 मध्ये 45 दिवस व 2017 मध्ये 40 दिवसांचे आंदोलन यापूर्वी केलेले आहे. आताही मागण्यांचा विचार जोपर्यंत होत नाही, तोपर्यंत अंगणवाड्यांना कुलूप असेल. बालकांना होणार्या त्रासास शासनच जबाबदार राहणार आहे.
- मदिना शेख, जिल्हाध्यक्षा, जिल्हा अंगणवाडी कर्मचारी युनियन
जिल्ह्यातील अंगणवाड्या - 5 हजार 634
कार्यरत अंगणवाडीसेविका - 4 हजार 595
मिनी सेविका - 816
मदतनीस - 4 हजार 142
सध्याचे मानधन
अंगणवाडीसेविका - 8 हजार 500
मिनीसेविका - 5 हजार 500
मदतनीस - 4 हजार 500