मंगळवारपासून अंगणवाडी सेविकांची आरोग्य तपासणी
अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar
1 ऑगस्ट (मंगळवार) पासून जिल्ह्यातील आरोग्य सेविका, मदतनीस, मिनी अंगणवाडी सेविका अशा 9 हजार महिलांची आरोग्य तपासणी सुरू होणार आहे. राज्य सरकारच्या महिला बालकल्याण विभागाचे आयुक्त यांच्या सुचनेनुसार ही आरोग्य तपासणी होणार असून यामुळे जिल्ह्यातील अंगणवाडी सेविका, मदतनीस यांच्या आरोग्याचा डेटा तयार होणार आहे. दरम्यान, आरोग्य तपासणी गंभीर स्वरूपाचे आजार आढळून आल्यास त्यांच्यावर शासकीय, खासगी मेडिकल कॉलेज याठिकाणी उपचार करण्यात येणार आहे. जिल्हा परिषद महिला बालकल्याण विभागाने आरोग्य तपासणीचे वेळापत्रक तयार केले असून दररोज प्रत्येक तालुक्यात किमान 100 ठिकाणी आरोग्य तपासणी मोहीम राबवण्यात येणार आहे.
जिल्ह्यातील शासकीय आरोग्य संस्था (प्राथमिक आरोग्य, उपकेंद्र, ग्रामीण रुग्णालय, उपजिल्हा रुग्णालय आणि जिल्हा रुग्णालय यांच्या सहकार्याने होणार्या आरोग्य तपासणीत महिलांमध्ये कॉमन आढळणार्या दहा आजारांची तपासणी करून त्यानुसार उपचार करण्यात येणार आहेत. या आरोग्य तपासणी मोहिमेमुळे जिल्ह्यातील अंगणवाडी सेविका, मदतनीत यांच्या आरोग्य कुंडली तयार होणार आहे. ग्रामीण भागात बालकांसह, गरोदर माता यांच्या आरोग्याची काळजी घेणार्या, तसेच महिला बालकल्याण विभागाच्या विविध योजना प्रभावीपणे राबवणार्या, वेळप्रसंगी आरोग्य विभागाच्या खांद्याला खांदा लावून काम करणार्या तसेच शासनाच्या विविध योजना यांची प्रभावी अंमलबजावणी करणार्या अंगणवाडी सेविका, मदतनीस, पर्यवेक्षिका यांच्या आरोग्याची काळजी घेण्याचा निर्णय महिला बालकल्याण आयुक्तालयाने घेतला होता. यासाठी महिलांमध्ये कॉमन पध्दतीने आढळून येणारे दहा आजारांची तपासणी करण्यात येणार आहे.
हिमोग्लोबीन, रक्तदाब, लघवी, हृदय रोगाच्या तपासणीसाठी आवश्यक असणारी ईसीजी, गर्भाशय पिशवी कॅन्सर, स्तन अन्य प्रकारच्या कॅन्सरच्या स्वतंत्र तपासण्या, दातांची आरोग्य तपासणी, मुख कन्सर तपासणी यांचा यात समावेश आहे. जिल्ह्यात 14 तालुक्यात महिला बालकल्याण विभागाचे 21 प्रकल्प कार्यरत असून यात अंगणवाडी सेविकांसोबत कंसात अंगणसाडी मदतनीस यांचा समावेश आहे. यात नगर ग्रामीण 221 (199), नगर ग्रामीण दोन 231 (215), नेवासा 164 (155), वडाळा 186 (180), श्रीगोंदा 217 (186), बेलवंडी 148 (129), पारनेर 193 (173), भाळवणी 147 (124), पाथर्डी 260 (253), शेवगाव 217 (164), संगमनेर 149 (121), घारगाव एक 178 (135), घारगाव दोन 150 (110), अकोले 277 (278), राजूर 201 (196), श्रीरामपूर 223 (167), राहुरी 311 (267), कर्जत 270 (207), जामखेड 177 (127), राहाता 295 (257), कोपरगाव 218 (205) यांच्या आरोग्य तपासणीचे नियोजन करण्यात आले असून मंगळवारपासून मोहिम जिल्हा भर राबवण्यात येणार आहे. या आरोग्य तपासणी मोहिमेत प्रकल्पनिहाय नियोजन करण्यात आले आहे.
जिल्ह्यातील शासकीय संस्थेच्या सहकार्याने अंगणवाडी सेविका, मदतनीस, पर्यवेक्षक यांच्या आरोग्याची तपासणी करण्यात येणार आहे. या मोहिमेचे नियोजन करण्यात आले असून 1 पासून त्यास सुरूवात होणार आहे. साधारण महिनाभर आरोग्य तपासणी सुरू राहणार असून यात महिलांमध्ये प्रामुख्याने आढळून येणार्या आजारांची तपासणी करण्यात येणार आहे.
मनोज ससे, जिल्हा प्रकल्प अधिकारी, महिला बालकल्याण विभाग.