अंगणवाडी सेविकेस धमकी

ग्रामपंचायत सदस्याविरुद्ध गुन्हा दाखल
अंगणवाडी सेविकेस धमकी

अकोले |प्रतिनिधी| Akole

तालुक्यातील पिंपळदरावाडी येथील अंगणवाडी सेविका सौ. चहाबाई पांडुरंग भांगरे यांना धमकी, मारहाण केल्याप्रकरणी पिंपळदरावाडी येथील ग्रामपंचायत सदस्य साहेबराव भगवंता भांगरे याचेविरुद्ध राजूर पोलिसांनी गुरुवारी गुन्हा दाखल केला आहे.

ग्रामपंचायत सदस्य साहेबराव भांगरे याने अमृत आहार योजनेचे आलेले पैसे न देता व बहीण सरपंच असताना याच बहिणीच्या नावाने खोट्या सह्या करून पैसे काढत असून मला नेहमी त्रास देऊन मारहाण करतो. या इसमापासून माझ्या जिविताला धोका असून त्याने मला अंगणवाडीत येऊन मारहाण केली. त्यामुळे संबंधित व्यक्तीवर कायदेशीर कारवाई करावी अशी फिर्याद राजूर पोलिसांकडे पिंपळदरावाडी येथील अंगणवाडी सेविका सौ. चहाबाई पांडुरंग भांगरे यांनी दिली.

साहेबराव भांगरे याची बहीण अंजनाबाई भांगरे या सरपंच आहेत. त्या टाकेदमध्ये राहतात. चेकवर सह्या आणण्यासाठी आम्हाला टाकेदला जावे लागते. आठ महिने झाले या व्यक्तीने चेकबुक ताब्यात घेतले. शेवटी मी मंगळसूत्र गहाण ठेवून वीस हजार रुपये काढून गरोदर माता स्तनदा माता यांना अमृत आहार योजनेचा आहार दिला. ही व्यक्ती सतत अंगणवाडीत येऊन दमबाजी करते तसेच मला राजीनामा देण्यास सांगते.

दि. 13 ऑगस्ट रोजी अंगणवाडीत येऊन मला मारहाण केली. 15 ऑगस्ट रोजी ग्रामसभा बोलावली तर तो पळून गेला. या व्यक्तिपासून माझ्या जिवितास धोका असून मला अंगणवाडीत येऊन दमबाजी करतो असे या फिर्यादीत म्हटले आहे. याप्रकरणी राजूर पोलीस ठाण्यात आरोपी साहेबराव भगवंता भांगरे याचेविरुद्ध भारतीय दंड संहिता कलम 323, 504, 506 प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक नरेंद्र साबळे यांच्या मार्गदर्शनाखाली हेड कॉन्स्टेबल डगळे करीत आहेत.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com