अंगणवाडी सेविका, आशा सेविकांना पगारवाढ करणार - ना. ठाकूर

एकवीरा फाउंडेशनचे महिला सबलीकरणाचे काम कौतुकास्पद-ना. थोरात
अंगणवाडी सेविका, आशा सेविकांना पगारवाढ करणार - ना. ठाकूर

संगमनेर |प्रतिनिधी| Sangamner

महसूलमंत्री बाळासाहेब थोरात हे राज्यातील सर्वसामान्य जनतेसाठी अविश्रांत काम करत असून इतरांना नेहमी प्रोत्साहन देतात. राज्यातील सर्व महिला भगिनींच्या पाठीशी ज्योतिबा प्रमाणे उभे असून अंगणवाडी सेविका व आशा सेविका यांच्या पेन्शन योजना, एलआयसी योजनेसह पगार वाढ करण्यात येणार असल्याची महत्त्वपूर्ण घोषणा राज्याच्या महिला व बालकल्याण विकास मंत्री यशोमती ठाकूर यांनी केली. तर एकविरा फाउंडेशनच्या माध्यमातून महिला सबलीकरणाचे होत असलेले काम कौतुकास्पद असल्याचे गौरवोद्गार महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी काढले आहेत.

संगमनेर येथे एकवीरा फाउंडेशनच्या वतीने करोनाच्या महासंकटात सेवाभावी पणे काम केलेल्या आरोग्य सेविका, अंगणवाडी सेविका, आशा सेविका, बचत गट महिला, मदतनीस या सर्व महिलांचा कार्यकर्तृत्वाचा कौतुक सोहळ्याप्रसंगी त्या बोलत होत्या. या कार्यक्रमात नामदार यशोमती ठाकूर यांनी ऑनलाईन पद्धतीने सहभाग घेतला तर अध्यक्षस्थानी महसूलमंत्री बाळासाहेब थोरात होते. व्यासपीठावर आमदार डॉ. सुधीर तांबे, सौ. कांचनताई थोरात, नगराध्यक्षा दुर्गाताई तांबे, सौ. शरयूताईताई देशमुख, एकवीरा फाउंडेशनचे अध्यक्षा कॅन्सर तज्ज्ञ डॉ. जयश्रीताई थोरात, जि. प. सभापती मिराताई शेटे, पंचायत समितीच्या सभापती सुनंदाताई जोर्वेकर, लताताई डांगे, राज्य काँग्रेसच्या सरचिटणीस उत्कर्षाताई रूपवते, अर्चनाताई बालोडे, प्रमिलाताई अभंग, निर्मलाताई गुंजाळ, इंद्रजीत थोरात आदी उपस्थित होते. यावेळी सर्व महिलांना सन्मानपत्र, जेवणाचे डबे, आरोग्य कार्ड, एकविराची आरोग्य पुस्तिका यांसह आरोग्य किट देऊन सन्मानित करण्यात आले.

नामदार यशोमती ठाकूर म्हणाल्या की, महसूलमंत्री बाळासाहेब थोरात हे समाजाच्या सर्वांगीण प्रगतीसाठी सातत्याने काम करत आहेत. त्यांचे काम हे सदैव इतरांना प्रेरणा देणारे असून आम्हा सर्व काँग्रेस जणांचे ते मार्गदर्शक आहेत. त्यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस जणांमध्ये मोठा आत्मविश्वास निर्माण झाला आहे. राज्यात महाविकास आघाडी सरकारने स्त्री - पुरुष समानतेसाठी सर्वसमावेशक असे नवीन महिला धोरण राबविले आहे. महिलांना आरक्षणापेक्षा आदर मिळाला पाहिजे. यासाठी सर्वत्र काम होणे गरजेचे आहे.

अंगणवाडी सेविका, आशा सेविका, मदतनीस यांनी करोना संकटांमध्ये केलेले काम अत्यंत कौतुकास्पद आहे. राज्यभरातील या सर्व भगिनींसाठी आगामी काळात नामदार बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वाखाली त्यांना एलआयसी योजना, पेन्शन योजना लागू व्हावी यासाठी धोरण ठरविण्यात आले आहे. सर्व महिला भगिनींची पगारवाढ लवकरच केली जाणार आहे. तसेच बाल संगोपनासाठी 2500 रुपये दिले जात असून ते 5000 होण्याकरता सरकारकडे पाठपुरावा केला जाणार आहे. डीपीडीसी मधून महिला बालकल्याण व आशा सेविकांच्या व्यवस्थेसाठी तीन टक्के निधी राखीव केला जाणार असल्याचेही त्या म्हणाल्या.

नामदार थोरात म्हणाले, राजीव गांधी यांनी देशामध्ये सर्वप्रथम महिलांना 33 टक्के आरक्षण देण्याचा निर्णय घेतला. राज्य पातळीवर हे आरक्षण 50 टक्के केले गेले असून महिलांना संधी मिळाली तर ते अत्यंत यशस्वीपणे कार्यभार सांभाळतात. करोना या संकट काळामध्ये आशा सेविका व अंगणवाडी सेविका यांनी अत्यंत मोलाचे काम केले असून गावातील प्रत्येक घरादारातील सुख दुःखात या महिला भगिनी सहभागी होत असतात. गावांचे आरोग्य जपणे यामध्ये या महिलांचे मोठे काम असून त्यांच्या पगारवाढीच्या मागणी बाबत आपण सकारात्मक असून सरकारकडे याबाबत पाठपुरावा करणार आहे. यशोमती ठाकूर हया अत्यंत कार्यक्षम महिला नेतृत्व असून त्यांनी या विभागाला एक नवी झळाळी दिली आहे. एकविरा फाउंडेशनच्या माध्यमातून डॉ. जयश्री व युवतींनी गावागावात पोहोचून केलेले काम कौतुकास्पद असल्याचेही ते म्हणाले.

आ. डॉ. सुधीर तांबे म्हणाले, महिला सशक्त झाली तर देश सशक्त होणार आहे. समाजातील शेवटचा घटक विकसित होण्यासाठी शासन काम करत असून उपेक्षित घटकांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी डॉ.जयश्री थोरात यांच्या माध्यमातून एकविरा फाउंडेशन हे नक्कीच महिलांचे आरोग्य जपण्यासाठी काम करील असा विश्वास व्यक्त केला आहे.

दुर्गाताई तांबे म्हणाल्या, करोना संकटात काम करणार्‍या महिला भगिनींचा संगमनेरात होत असलेला कौतुकसोहळा हा देशातील एकमेव कौतुकसोहळा असावा. यातून काम करणार्‍या महिलांना नक्कीच प्रोत्साहन मिळणार आहे.

यावेळी प्रांताधिकारी डॉ. शशिकांत मंगरुळे, तहसीलदार अमोल निकम, गटविकास अधिकारी अनिल नागणे, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. सुरेश घोलप, श्रीमती कुकडे, एकविराच्या सदस्य डॉ. वृषाली साबळे, सुरभी मोरे, शिल्पा गुंजाळ, प्राजक्ता घुले, अहिल्या ओहोळ, ऐश्वर्या वाकचौरे, ज्योती थोरात, पूजा थोरात, मिताली भडांगे, आदिती झंवर, जानवी कळसकर, मयुरी थोरात, अर्चना नवले यांच्यासह महिला कार्यकर्त्या मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.

प्रास्ताविक एकविरा फाउंडेशन च्या संस्थापक अध्यक्ष कॅन्सर तज्ञ डॉ. जयश्रीताई थोरात यांनी केले. सूत्रसंचालन आदिती खोजे व वैष्णवी कापसे यांनी केले तर प्राजक्ता घुले यांनी आभार मानले.

- डॉ. जयश्री थोरात यांचेे काम प्रशंसनीय

कॅन्सर तज्ञ डॉ.जयश्री थोरात या महिलांच्या आरोग्याबाबत सतत सतर्क असून त्या राज्य पातळीवर महिलांच्या आरोग्याबाबत सातत्याने विविध विषयांवर सहभाग घेऊन आपले मत व्यक्त करत असतात. संगमनेर तालुक्यातही त्यांनी महिलांसाठी केलेले काम हे कौतुकास्पद असल्याचे गौरवोद्गार नामदार यशोमती ठाकूर यांनी काढले आहे.

अंगणवाडी व आशा सेविकांसाठी मोफत आरोग्य तपासण्या

एसएमबीटी सेवाभावी हॉस्पिटलच्या वतीने तालुक्यातील सर्व आशासेविका, अंगणवाडी सेविका, आरोग्य सेविका व मदतनीस यांच्या आठ तपासण्या मोफत केल्या जाणार असून घरातील एक व्यक्ति किंवा नातेवाईक महिलांची ही तपासणी मोफत होणार आहे. या सर्वांना दर शनिवारी एसएमबीटी हॉस्पिटलला जाण्यासाठी एसटी बसची सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे. याचबरोबर या सर्व महिला भगिनींनी संगमनेर तालुक्यातील अग्रमानांकित अशा सहकारी शिखर संस्थांना भेट देण्यासाठी व्यवस्था करण्यात येईल असे ना. थोरात यांनी म्हटले आहे. यावेळी महिला भगिनींनी टाळ्यांचा प्रचंड कडकडाट केला.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com