259 अंगणवाड्या ग्रामीणमधून जाणार नागरी क्षेत्रात

भिंगारसह नेवासा, शेवगाव आणि जामखेडमधील बीटही बंद होणार
259 अंगणवाड्या ग्रामीणमधून जाणार नागरी क्षेत्रात
File Photo

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

शहरा लगत असणार्‍या अथवा नगर परिषद, छावणी परिषदेच्या हद्दीत असणार्‍या मात्र ग्रामपंचायतींच्या अंतर्गत येणार्‍या जिल्ह्यातील 259 अंगणवाड्या आता थेट नागरी क्षेत्रात समावेश करून त्यांचे नियोजन, नियंत्रण हे संबंधीत नगर परिषद, नगर पालिका अथवा छावणी परिषदेच्या ताब्यात देण्यात येणार आहे. यासह भिंगार छावणी क्षेत्रातील 3 बीट, नेवासा तालुक्यातील 1 बीट, शेवगाव तालुक्यातील 2 बीट आणि जामखेड 2 बीट हे कायमस्वरूपी बंद करण्यात येणार आहे. राज्याच्या महिला बालकल्याण विभागाने या बाबतचा निर्णय घेतला आहे.

राज्यात अनेक ठिकाणी नागरिक होतांना दिसत आहे. ग्रामपंचायतीचे रुपांतर नगर परिषद अथवा नगर पालिकांमध्ये होत आहे. काही ठिकाणी महानगरपालिकांची हद्द वाढत असून शहरा लगत असणार्‍या गावांचा समावेश महानगर पालिकांमध्ये होत आहे. यावेळी अन्य शासकीय यंत्रणा संबंधित नागरी यंत्रणेच्या ताब्यात जात आहेत. मात्र, नगरसह राज्यात अनेक ठिकाणी अंगणवाड्या ग्रामीण यंत्रणा म्हणजे जिल्हा परिषदेकड राहत आहे. अशा वेळी त्यांना निधी आणि सुविधा कशा पुरवाव्यात असा प्रश्न जिल्हा परिषद महिला बालकल्याण विभागासमोर होता.

या शिवाय ग्रामीण पेक्षा नागरी भागतील अंगणवाड्यांना अनुदान आणि अन्य सुविधा अधिक असल्याने नागरी भागात असणार्‍या ग्रामीण यंत्रणेकडील अंगणवाड्या मनुष्यबळासह नागरी यंत्रणेकडे हस्तांतर करण्यात येत आहेत. नगर जिल्ह्यात जिल्हा परिषदेच्या महिला बालकल्याण विभागाचे 21 प्रकल्प कार्यरत आहेत. या प्रकल्पातील सात प्रकल्पांतून ग्रामीण भागातील अंगणवाड्या हा नागरी यंत्रणेकडे हस्तांतरीत होणार आहे. यात 259 अंगणवाड्यांचा समावेश आहे. जिल्ह्यात नागरी भागात हस्तांतरण केल्यानंतर सात तालुक्यांत 1 हजार 893 अंगणवाड्या आणि मिनी अंगणवाड्या राहणार आहेत. यात भिंगार (ग्रामीण) 93, नेवासा 222, शेवगाव 277, कर्जत 356, जामखेड 228, पारनेर 392, अकोले 325 यांचा समावेश आहे.

हस्तांरित होणार्‍या अंगणवाड्या

भिंगार (ग्रामीण) 76, नेवासा 26, शेवगाव 48, कर्जत 25, जामखेड 47, पारनेर 49, अकोले 42 यांचा समावेश आहे.

Related Stories

No stories found.