...आणि मृत्यूनंतर पक्षाचा बिल्लाही माझ्या समवेत न्या
सार्वमत

...आणि मृत्यूनंतर पक्षाचा बिल्लाही माझ्या समवेत न्या

वडिलांची इच्छा म्हणून तो शेतकरी संघटनेचा बिल्लाही त्यांच्या अंत्यसंस्कार प्रसंगी त्यांच्यासमवेत ठेवण्यात आला.

Nilesh Jadhav

इंदोरी | वार्ताहर | Indori

आयुष्याच्या उमेदीच्या काळात छातीवर लावलेला आणि आयुष्यभर स्वाभिमानाने मिळविलेला शेतकरी संघटनेचा बिल्ला आपल्या मृत्युनंतरही आपल्या पार्थिवावर ठेवावा अशी अपेक्षा शेतकरी संघटनेचे एकनिष्ठ पाईक असणारे अकोले तालुक्यातील रुंभोडी येथील 82 वर्षीय आनंदा लक्ष्‍मण मालुंजकर यांनी आपल्या मूलांकडे व्यक्त केली होती. मुलांकडे ही भावना व्यक्त केल्या नंतर अवघ्या दोन तासांतच त्यांची प्राणज्योत मालविली. त्यांच्या इच्छेनुसार त्यांच्या अंत्यसंस्कार प्रसंगी हा बिल्ला त्यांच्या पार्थिवावर ठेवण्यात आला होता.

आयुष्यभर शेतकरी संघटनेशी एकनिष्ठ राहिलेल्या या कार्यकर्त्याने मृत्युनंतर ही संघटनेच्या बिल्ल्याला सोडले नाही. एकीकडे सत्तेसाठी पक्षाला पायदळी तुडवणारे नेते आणि ८२ व्या वर्षीही पक्षाच्या निष्ठेला प्राणाहुन ही प्रेम देणारे मालुंजकर यांच्या पक्ष व निष्टेची चर्चा मृत्यूनंतर सुरू होती.

अकोले तालुक्यातील रूंभोडी येथील शेतकरी संघटनेचे संस्थापक स्व. शरद जोशी यांच्या नेतृत्वाखाली काम करणारे ८२ वर्षीय आनंदा लक्ष्‍मण मालुंजकर यांचे नुकतेच वृद्धापकाळाने निधन झाले. इंदोरी रूंभोडी परिसरात स्व. शरद जोशी आले असता त्यांच्या विचाराचा प्रभाव शेतकरी असल्याने स्व.मालुंजकर यांच्यावर पडला. तेव्हापासूनच खिशाला लावलेला शेतकरी संघटनेचा बिल्यातुनच आयुष्यभराचा आपला पक्ष प्रवास सुरू झाला. मात्र गरीब जरी असलो तरी निष्ठा बदलणार नाही असा शब्द स्वर्गीय जोशींना दिल्याने वयाच्या ८२ वर्षापर्यंत शर्टला किंवा शर्टच्या आत असलेल्या कोपरीला तो लाल बिल्ला सतत दिसत असत. वृद्धापकाळाने क्षिण झाल्याने बरेच दिवस एकाच ठिकाणी असलेल्या मालुंजकर यांनी मृत्यूच्या दोन तास अगोदर आपल्या मुलांना आपल्याजवळ बोलून घेतले आणि माझ्या अंत्यसंस्काराच्या ठिकाणी माझा शेतकरी संघटनेचा बिल्लाही माझ्यासमवेत न्या असे सांगितले. मुलांनी डोळ्यात अश्रू आणत हे ऐकल्यानंतर अवघ्या दोनच तासात वडिलांनी प्राण सोडला. मग वडिलांची इच्छा म्हणून तो शेतकरी संघटनेचा बिल्लाही त्यांच्या अंत्यसंस्कार प्रसंगी त्यांच्यासमवेत ठेवण्यात आला.

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com