कठडे नसलेल्या प्रवरा पात्रातील वळदगाव बंधार्‍यावरून पडून वृध्द ठार

कठडे नसलेल्या प्रवरा पात्रातील वळदगाव बंधार्‍यावरून पडून वृध्द ठार

श्रीरामपूर (प्रतिनिधी)

श्रीरामपूर तालुक्यातील वळदगाव येथील प्रवरा नदीच्या पात्रात असलेल्या कठडे नसलेल्या कोल्हापूर टाईप बंधार्‍यांच्या भिंतीवरून पडून चांदेगाव (ता. राहुरी) येथील वृध्द ठार झाला. ही घटना आज शनिवारी सकाळी 8.30 वाजण्याच्या सुमारास घडली.

रंगनाथ गोविंद वायदंडे असे या दुर्घटनेत ठार झालेल्या वृध्दाचे नाव आहे. काल सकाळी श्री. वायदंडे हे आपल्या सायकलवरून या बंधार्‍याच्या भिंतीवरून जात असताना तोल जावून ते नदीपात्रातील खडकावर पडले. त्यांच्या डोक्याला व पायाला मार लागून ते जबर जखमी झाले. त्यांना उपचारासाठी शिर्डी येथील रुग्णालयात घेवून जात असताना रस्त्यातच त्यांचा मृत्यू झाला.

या कोल्हापूर पध्दतीच्या बंधार्‍याची कठडे गायब झाले आहेत. गेल्या पाच वर्षापासून या ठिकाणी कठडे बसविण्याची मागणी असताना पाटबंधारे विभाग याकडे सोयिस्कररित्या दुर्लक्ष करीत आहे. कठडे नसल्याने आतापर्यंत सहा-सात जण या बंधार्‍यावरून खाली पडले आहेत. मात्र सुर्देवाने कुणाचा बळी गेला नव्हता. शेवटी रंगनाथ वायदंडे यांचा बळी या कठडे नसलेल्या बंधार्‍याने घेतला आहे.

चांदेगाव हे राहुरी तालुक्यातील गाव असले तरी या गावातील नागरिकांचा शेतमालाच्या बाजारपेठेपासून शाळा व महाविद्यालयीन शिक्षणासाठी दररोजचा संबध बेलापूर व श्रीरामपूर शहराशी येतो. विशेष म्हणजे बेलापूरला येण्यासाठी हा जवळचा मार्ग असल्याने चांदेगावचे नागरिक नियमित या बंधार्‍यावरील रस्त्याचा वापर करतात.

या बंधार्‍यावर मोठ्या प्रमाणावर निधी खर्च केल्याचे दरवर्षी पाटबंधारे विभागाकडून सांगण्यात येते, मग गेल्या पाच वर्षात या बंधार्‍याला संरक्षक कठडे कसे बसले नाही? असा प्रश्‍न उपस्थित होत आहे. आजच्या या दुर्घटनेमुळे तरी पाटबंधारे विभागाला जाग येईल, अशी अपेक्षा या भागातील नागरिकांकडून व्यक्त होत आहे.

Related Stories

No stories found.