अमृतसागर दूध संघ निवडणूक भाजप स्वबळावर लढवणार- वैभव पिचड

अमृतसागर दूध संघ निवडणूक भाजप स्वबळावर लढवणार- वैभव पिचड

अकोले |प्रतिनिधी| Akole

अमृतसागर दूध संघाची निवडणूक भाजप स्वबळावर लढवणार असून राज्यात सर्वात जास्त रिबेट देणारा आपला संघ आहे. तसेच दूध उत्पादकांना सर्वात जास्त फायदा करून दिला आहे व गेल्या अनेक वर्षांनंतर दूध संघ नफ्यात नेला आहे. पुन्हा एकदा दूध संघ ताब्यात आल्यावर यापेक्षाही चांगला दूध संघ चालवून दाखवू असे प्रतिपादन माजी आमदार तथा अमृतसागर दूध संघाचे चेअरमन वैभव पिचड यांनी केले.

अमृतसागर दूध संघाचे निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला आहे. त्या पार्श्वभूमीवर भाजप पक्ष कार्यालयात कार्यकर्त्यांच्या बैठकीत श्री. पिचड बोलत होते.

यावेळी शेतकरी विकास मंडळ अध्यक्ष गिरजाजी जाधव, जिल्हा सरचिटणीस जालिंदर वाकचौरे, ज्येष्ठ नेते शिवाजीराव धुमाळ, भाऊसाहेब रकटे, सिताराम देशमुख, अमृतसागरचे व्हा. चेअरमन रावसाहेब वाकचौरे, अकोले एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष सुनील दातीर, सेक्रेटरी सुधाकर देशमुख, सी. बी. भांगरे, आनंदराव वाकचौरे, सोमनाथ मेंगाळ, राहुल देशमुख आदींसह अनेक कार्यकर्ते, दूध उत्पादक शेतकरी, दूध संघाचे मतदार मोठ्या संख्येने उपस्थित होते.

श्री. पिचड बोलताना पुढे म्हणाले की, यापूर्वी 10 ते 15 पैसे रिबेट वाढवून द्यावे यासाठी दूध उत्पादक वार्षिक सर्वसाधारण सभेत भांडत होते. मात्र माझ्या काळात ती वेळ कधीही आली नाही. 80 पैसे रिबेट पासून वाढवीत वाढवीत 2 रुपये रिबेट दिले. हा राज्यात एक नंबर रिबेट देणारा अमृतसागर दूध संघ आहे. सध्या 80 ते 85 हजार लिटर दुध संकलन असून ते वाढविणे गरजेचे आहे. दूध संकलन वाढविल्यास अमृतसागर दूध संघ राज्यात एक नंबरवर नेला जाईल. दूध उत्पादकांसाठी अनेक दूध संकलन केंद्रावर बल्क कुलर बसविले आहेत. दुधपासून बनविण्यात येणार्‍या उप पदार्थांना बाजारात मोठी मागणी आहे. अनेक वर्षानंतर दूध संघ नफ्यात चालू आहे ही बाब मागील काही वर्षाची तुलना केल्यावर लक्षात येईल.

माझे वडील पिचड आजारी असताना मुलगा म्हणून माझी मोठी जबाबदारी आहे त्यांच्या आजारपणात त्यांच्या बरोबर राहण्याची. तरी काहींनी प्रचार केला की, पिचड निवडणूक सोडून गेले. ही बाब दुर्दैवी आहे.

यावेळी सुधाकरराव आरोटे, श्री. साबळे, भाऊसाहेब रक्टे, कैलास जाधव, सुधाकरराव देशमुख, जालिंदर वाकचौरे यांनी मनोगत व्यक्त केले. स्वागत व प्रास्तविक यशवंतराव आभाळे यांनी तर भाऊसाहेब वाकचौरे यांनी आभार मानले.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com