
राहुरी |तालुका प्रतिनिधी| Rahuri
डॉ. तनपुरे कारखान्याने आपल्यावर केलेली जप्तीची कारवाई केवळ रक्कम वसुलीसाठी नव्हे तर हेतूपुरस्सर कारखान्याच्या होत असलेल्या कथित गैरव्यवहाराबद्दल सतत न्यायालय व इतर माध्यमातून आवाज आपण उठवित असल्याने आपल्यावर ही कारवाई केली आहे, असा घणाघाती आरोप मुसळवाडीचे सरपंच अमृतराव धुमाळ यांनी केला आहे.
कारखान्याकडे हजारो लोकांकडे अॅडव्हान्स असल्याची नोंद आहे. काहींना तर काहीही संबंध नसताना ऊस नसताना अॅडव्हान्स वाटप झालेले असून यातून कोणतीही वसुलीची शक्यता नाही. परंतु वसुलीत स्वारस्य नव्हे तर केवळ कारखान्यातील संलग्न संस्थांच्या जमीन विक्रीबाबत न्यायालयात सहकार खात्याकडे वेळोवेळी म्हणणे मांडून दाद मागितली. म्हणून सर्वांना सोडून केवळ आपल्यावर कारवाई करण्याचा प्रयत्न सुरू आहे.
न्यायालयाच्या निर्णयाचा आपण कायमच आदर केला आहे व कारखाना थकबाकी आपण भरणारच आहोत, यात कुठलीही शंका घेण्याचे कारण नाही.सभासदांमध्ये जागृतीचे काम आपण सुरूच ठेवणार, असा विश्वास अमृत धुमाळ यांनी बोलून दाखवला.