नरेंद्र मोदींचे स्वप्न बचत गट चळवळीतून पूर्ण होईल - अमृता फडणवीस

नरेंद्र मोदींचे स्वप्न बचत गट चळवळीतून पूर्ण होईल - अमृता फडणवीस

लोणी |वार्ताहर| Loni

बचत गटासारख्या चळवळीतून प्रत्येक गावाने आर्थिक विकासात योगदान दिल्यास पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पाहिलेले 5 अब्ज डॉलर्स अर्थव्यवस्थेचे स्वप्न पूर्ण होण्यास वेगळ लागणार नाही, पण यासाठी कष्ट, सुंदर उत्पादन, ट्रेनिंग घेऊन चांगले मार्केटींग असा प्रवास तुम्हाला करावा लागेल. प्रवरेच्या बचत गटांचा हा यशस्वी प्रवास पाहण्यासाठी मी पुन्हा येईन असा आशावाद व्यक्त करून सौ.अमृता फडणवीस यांनी उपस्थित महिलांमध्ये नवा आत्मविश्वास निर्माण केला

जनसेवा फाउंडेशन आणि राहाता पंचायत समिती यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित महिला बचत गटांचा मेळावा शालिनीताई विखे पाटील यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाला. मेळाव्यापूर्वी सौ.अृमता फडणवीस यांच्याहस्ते सिंधूताई शेतकरी महिला उत्पादक कंपनी, महिलांकरिता स्वतंत्र व्यायामशाळेचे उद्घाटन करण्यात आले. जनसेवा फाउंडेशनच्या माध्यमातून उत्पादीत करण्यात येत असलेल्या सेंद्रीय सॅनिटरी नॅपकीनच्या उत्पादनाची पाहणी करून, त्यांनी समाधान व्यक्त केले. महिला बचत गटांना या मेळाव्यात 2 कोटी रुपयांच्या अनुदानाचे वितरण तसेच प्रधानमंत्री अन्न सुरक्षा अभियाना अंतर्गत बियाणांचे वाटप सौ. फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आले.

लोणी परिसरात येताच सौ. फडणवीस यांनी प्रवरानगर येथे सहकार चळवळीचे जनक पद्मश्री डॉ.विठ्ठलराव विखे पाटील आणि माजी केंद्रीय मंत्री पद्मभूषण डॉ.बाळासाहेब विखे पाटील यांच्या स्मृतीस्थळावर जाऊन पुष्पचक्र अर्पण केले. याप्रसंगी खासदार डॉ.सुजय विखे पाटील, कारखान्याचे व्हा.चेअरमन विश्वासराव कडू यांच्यासह सर्व संचालक ,अधिकारी उपस्थित होते. याप्रसंगी अकोले नगर परिषदेच्या नगराध्यक्षा सोनालीताई नाईकवाडी, उपविभागीय कृषी आधिकारी सुधाकर बोराळे, प्रभारी गटविकास अधिकारी श्री.सूर्यवंशी, तालुका कृषी आधिकारी बापूसाहेब शिंदे, प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेच्या सेक्रेटरी लिलावती सरोदे, जनसेवा फाउंडेशनचे सचिव डॉ.हरिभाऊ आहेर, लोणी बुद्रुकच्या सरपंच कल्पना मैड, प्रभावती खालकर, प्रकल्प संचालिका रुपाली लोंढे यांच्यासह बचत गटांच्या महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.

याप्रसंगी महिलांशी संवाद साधताना सौ. फडणवीस म्हणाल्या, समाजातील प्रत्येक महिला ही पुजनिय आहे, तिच्यामध्ये एक सकारात्मक उर्जाही आहे. वेगवेगळ्या क्षेत्रात महिला आपल्या स्वकर्तृत्वाने पुढे जात आहेत. बेटी बचाव बेटी पढाव पेक्षा आता बेटी को आगे बढाओ, घर पे मत बिठाओ असा संदेश घेऊन पुढे जावे लागणार आहे. यातूनच नवा आत्मविश्वास निर्माण होईल, असे त्यांनी स्पष्ट केले. पिता, पुत्र आणि पती या पलिकडेही जाऊन आता महिलांना आपल्या उत्कर्षाचा विचार करावा लागेल. नवर्‍याबरोबर घर उत्तमपणे चालवू शकते. तसेच आता कोणत्याही क्षेत्रात आपण चांगले काम करून दाखवू शकतो हा विश्वास मनामध्ये बाळगून काम केले पाहीजे.

ऐकायचे जगाचे आणि करायचे मनाचे हा संदेश देऊन सौ.फडणवीस म्हणाल्या, बचत गटांनी कर्ज जरुर घ्यावे, यातून लघुउद्योग, कुटीर उद्योग उभारून दाखवावे. कारण बँकींग क्षेत्रातील माझा अनुभव असा आहे, खुप मोठ्या टक्केवारीने कर्ज हे बुडत असतात परंतु महिला बचत गट कर्ज परत करत आहे. याचा मला अभिमान आहे. तुमच्या उत्पादनाची विक्री चांगल्या पध्दतीने होत आहे. या मागे तुमची मेहनत सुंदर उत्पादन देण्याची संकल्पना आणि मार्केटींगसाठी चांगले ट्रेनिंगची शिदोरी तुमच्याकडे असल्यानेच तुमचा प्रवास जनसेवा फाउंडेशन आणि विखे पाटील कुटुंबियांच्या माध्यमातून यशस्वी सुरू होणारा प्रवास पाहण्यासाठी मी पुन्हा येईन कारण या भागामध्ये विकासाचे पाहाण्यासारखे काम खुप आहे.

याप्रसंगी शालिनीताई विखे पाटील यांनी जनसेवा फाउंडेशनच्या माध्यमातून सुरू असलेल्या कार्याची माहिती आपल्या भाषणातून देतानाच सौ.फडणवीस यांच्यासारख्या बँकींग क्षेत्रातील अनुभवी व्यक्तितत्व आपल्या महिलांशी संवाद साधण्यासाठी आल्या याचा मला खुप अभिमान असल्याचे नमुद केले. गटविकास अधिकारी श्री.सूर्यवंशी यांनी प्रास्ताविक केले. डॉ.हरिभाऊ आहेर यांनी आभार मानले.

शिव तांडव स्तोत्राचे गायन

उपस्थित महिलांच्या आग्रहाखातर सौ.अमृता फडणवीस यांनी शिवतांडव स्तोत्राच्या काही ओळी गाऊन दाखविल्या. पूर्ण गाणं गाऊन दाखविण्यासाठीही ‘मी पुन्हा येईन’ असे अभिवचन देताना महिलांनी टाळ्यांच्या गजरात त्यांना दाद दिली.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com