‘अमृत’बाबतच्या पदाधिकार्‍यांच्या घोषणा हवेत

पाणी पडूनही नवीन टाकी कार्यान्वित होईना!
‘अमृत’बाबतच्या पदाधिकार्‍यांच्या घोषणा हवेत

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

महापालिकेमार्फत सुमारे सव्वाशे कोटी रुपये खर्चून करण्यात आलेल्या अमृत पाणी योजनेचे काम पूर्ण झाले आहे. नव्याने बसवण्यात आलेल्या पंपामुळे पाणी उपसाही वाढला आहे. वसंतटेकडी येथे नव्याने बांधण्यात आलेल्या टाकीत पाणीही पडले आहे. मात्र, अद्यापही ही टाकी कार्यान्वित केली जात नसल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. नवीन टाकीतून पाणीपुरवठा सुरू होणार व शहराचा पाणी प्रश्न कायमचा सुटणार अशा घोषणा राजकीय पदाधिकार्‍यांनी केल्या. मात्र, नवीन टाकी का कार्यान्वित होत नाही, असा सवाल उपस्थित होत आहे.

केंद्र सरकारच्या अमृत अभियानांतर्गत सहा वर्षांपासून सुरू असलेल्या पाणी योजनेचे काम पूर्ण झाले आहे. मुळा धरणापासून ते विळद व तेथून वसंत टेकडीपर्यंत नवीन जलवाहिनी टाकण्यात आली आहे. विळद येथे नवीन जलशुध्दीकरण केंद्र, वसंतटेकडी येथे 50 लाख लीटर क्षमतेची नवीन टाकी उभारण्यात आली आहे. जुन्या टाकीचीही दुरूस्ती करण्यात आली आहे. विळद येथे 600 एचपी क्षमतेचे तीन नवीन पंप बसवण्यात आले आहेत.

सद्यस्थितीत महापालिका मुळा धरणातून दररोज सुमारे 90 एमएलडी पाणी उपसा केला जातो. नवीन पंपामुळे अतिरिक्त 24 ते 30 एमएलडी पाणी वाढणार आहे. नव्याने उभारण्यात आलेल्या टाकीत या पंपाव्दारे पाणी सोडण्यात आले आहे. गेल्या 15 दिवसांपासून याची चाचणी सुरू आहे. चाचणी यशस्वी झाली असल्याने या टाकीतून पाणीपुरवठा सुरू होईल, अशी अपेक्षा नगरकरांना आहे. मात्र, अद्यापही ही टाकी कार्यान्वित होत नसल्याने उलट सुलट चर्चा सुरू आहेत. गेल्या महिनाभरापासून सर्वच प्रमुख राजकीय पदाधिकारी व मनपाचे अधिकारी अमृत योजना पूर्ण झाली असून लवकरच शहराचा पाणी प्रश्न कायमचा सुटणार अशा घोषणा करत आहेत. मात्र, प्रशासन टाकी कार्यान्वित करत नसल्याने संभ्रम वाढला आहे.

दरम्यान, नवीन टाकीतून पाणीपुरवठा सुरू केल्यास सध्यापेक्षा जास्त दाबाने नगरकरांना पाणी उपलब्ध होणार आहे. असे असतानाही नवीन टाकी ऐवजी जुन्याच टाकीव्दारे पाणीपुरवठा सुरू ठेवण्याचा घाट घातल्याची चर्चा आहे. नवीन टाकीतून पाणी देण्यास काही अधिकारी व राजकीय पदाधिकार्‍यांचा विरोध असल्याचे बोलले जात आहे. महापालिका आयुक्त याबाबत काय निर्णय घेतात, याकडे लक्ष लागले आहे.

   
logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com