आरोग्य तपासणी न झाल्याने मनपा कर्मचार्‍यांचे पुन्हा आंदोलन
सार्वमत

आरोग्य तपासणी न झाल्याने मनपा कर्मचार्‍यांचे पुन्हा आंदोलन

महापौर वाकळे यांच्याकडून आरोग्य अधिकार्‍यांची कानउघाडणी

Arvind Arkhade

अहमदनगर|प्रतिनिधी|Ahmednagar

तीन दिवस कामकाज बंद ठेवल्यानंतर गुरुवारी (दि. 16) महापालिकेचे कर्मचारी कार्यालयात आले. मात्र, दुपारपर्यंत आरोग्य विभागाने त्यांची आरोग्य तपासणी न केल्याने संतप्त झालेल्या कर्मचार्‍यांनी मनपा प्रवेशद्वारात पुन्हा ठिय्या आंदोलन सुरू केले. महापौर बाबासाहेब वाकळे यांना हे समजताच त्यांनी महापालिकेत येऊन आरोग्य विभागाच्या कारभाराचे वाभाडे काढले.

मनपा एका अधिकार्‍यांसह काही कर्मचार्‍यांना करोनाची बाधा झाल्याने भयभीत झालेल्या कर्मचार्‍यांनी तीन दिवस काम बंद ठेवले होते. बुधवारी (दि. 15) महापौर वाकळे यांनी आयुक्त श्रीकांत मायकलवार व कामगार युनियनचे अध्यक्ष अनंत लोखंडे यांच्यासमवेत बैठक घेऊन कर्मचार्‍यांनी कामकाज सुरू करावे, त्यांची आरोग्य तपासणी तातडीने करण्यात येईल, असे आश्वासन दिले होते.

त्यानुसार गुरुवारी सकाळपासून कर्मचारी कार्यालयात आले. मात्र, दुपारपर्यंत वाट पाहूनही आरोग्य विभागाकडून तपासणी सुरू झाली नव्हती. त्यामुळे कामगार युनियनचे अध्यक्ष अनंत लोखंडे यांनी कर्मचार्‍यांसमवेत महापालिकेच्या प्रवेशद्वाराबाहेर ठिय्या आंदोलन सुरू केले.

याबाबत महापौर वाकळे यांना समजताच त्यांनी महापालिकेत येऊन आंदोलनकर्त्या कर्मचार्‍यांसमोर वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. अनिल बोरगे यांना खडेबोल सुनावले. आरोग्य विभाग अशा पद्धतीने बेजबाबदारीने काम करणार असेल तर गंभीर विचार करावा लागेल, असा इशाराही त्यांनी यावेळी दिला. तसेच आयुक्तांनाही आरोग्य विभागाचा कारभार सुधारा, असा सल्ला दिला. त्यानंतर दुपारी उशिरा कर्मचार्‍यांची आरोग्य तपासणी सुरू करण्यात आली.

Deshdoot
www.deshdoot.com